वाहतूक कोंडीचा गुंता सोडवण्यासाठी पालिकेचा पुढाकार
मुंबईत सातत्याने वाढत असलेला वाहतूक कोंडीचा गुंता सोडवण्यासाठी वाहतूक बेटांचे आकारमान कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी लागणारा कोटय़वधी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची तयारीही पालिका आयुक्तांनी दर्शवली आहे. गेल्या वर्षी पदपथांची रुंदी कमी करून वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न पालिका प्रशासनाने केला होता.
शहरात अनेक ठिकाणचे चौक सुशोभित दिसावेत म्हणून छोटेखानी वाहतूक बेटांची उभारणी करण्यात आली आहे. काही बेटे वृक्षवल्लीने सजली आहेत. तर काही बेटांच्या माध्यमातून जनजागृतीचे संदेश देण्यात आले आहेत. मात्र, आता ही बेटे वाहतुकीला अडसर ठरू लागली आहेत. अनेक चौकांमध्ये वाहनांना तासन्तास रखडावे लागते. त्यामुळे चौकांमधील बेटांचे आकारमान कमी करून अथवा काही ठिकाणचे बेट काढून टाकून वाहतुकीला रस्ता मोकळा करून देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लवकरच हे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती पालिका आयुक्त अजय मेहता यांनी पालिकेच्या गटनेत्यांच्या बैठकीत दिली.
प्रशासनाने रस्त्यांच्या कामांसाठी दोन हजार कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यात आणखी एक हजार कोटी रुपयांची भर घालण्यात येईल. हा निधी वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी वापरण्यात येईल, असे मेहता यांनी स्पष्ट केले. सध्या मुंबईमधील चौकांची पाहणी करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या चौकांचे रुंदीकरण कशा पद्धतीने करता येईल याचा अभ्यास करून योग्य ती कारवाई करण्यात येईल. नगरसेवकांनी आपापल्या विभागातील वाहतूक कोंडीची माहिती प्रशासनाला दिल्यास योग्य तो तोडगा काढता येईल. तसेच चौकांतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आवश्यक तेवढा निधीही उपलब्ध करता येईल, असे अजय मेहता यांनी सांगितले.
विकास आराखडा फेब्रुवारीत
मुंबईच्या २०१४-३४ या कालावधीतील विकास आराखडय़ातील त्रुटी दूर करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून १६ फेब्रुवारी २०१६ पर्यंत तो सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याबाबत सूचना आणि हरकती मागविण्यात येतील, अशी माहिती आयुक्तांनी दिली. विकास आराखडय़ातील चुका चार टप्प्यांमध्ये दुरुस्त करण्यात येत आहेत. गायब झालेल्या इमारतींचा पहिल्या टप्प्यामध्ये विकास आराखडय़ात समावेश करण्यात आला आहे. त्रुटी दूर करण्याची जबाबदारी पालिका विभाग कार्यालयांमधील साहाय्यक आयुक्तांवर सोपविण्यात आली आहे.