ऐरोलीतून ठाणे खाडीच्या जलसफरीचा अनुभव; जैवविविधतेचेही दर्शन

अक्षय मांडवकर, मुंबई</strong>

मुंबई, ठाण्यात अद्याप थंडीची चाहूल लागली नसली तरी या शहरांतील खाडी परिसरावर मात्र गुलाबी पंखांची चादर पसरली आहे. दरवर्षी न चुकता मुंबई, ठाण्यात मुक्कामाला येणारे रोहित अर्थात फ्लेमिंगो पक्षी दाखल झाले असून येत्या १ नोव्हेंबरपासून पर्यटकांना अगदी जवळून हे पक्षी न्याहाळता येणार आहेत. वन विभागाच्या वतीने पुढील आठवडय़ापासून ऐरोली येथून ठाणे खाडीची बोटसफर सुरू करण्यात येणार आहे.

खारफुटी आणि सागरी  परिसंस्थेच्या जैवविविधतेविषयी माहिती देणारे ‘किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र’ कांदळवन संरक्षण विभागाने ऐरोली खाडीलगत उभारले आहे. या केंद्रात माहिती देणारी दोन मोठी दालने असून खेकडय़ांची शेती, खाडी निरीक्षण, फ्लेमिंगो दर्शन फेरी असे उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येतात. या माध्यमातून वन विभागाच्या खात्यात उत्पन्न जमा होते.

दरवर्षी १,६९० हेक्टरवर पसरलेल्या फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा लाभलेल्या ठाण्याच्या खाडीत गुजरातच्या कच्छच्या रणातून फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन होते. साधारण ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यांत हे पक्षी मोठय़ा संख्येने दाखल होतात. मात्र २०१७ मध्ये या चक्रात खंड पडून जानेवारी-फेब्रुवारी २०१८ मध्ये या पक्ष्यांचे खाडीत दर्शन झाले होते.

पक्षिनिरीक्षक  आणि सामान्य पर्यटकांना फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन करता यावे याकरिता ऐरोलीच्या केंद्रातून सर्वप्रथम फेब्रुवारी महिन्यात बोट सोडल्या गेल्या होत्या. मात्र त्या वेळी फ्लेमिंगो आगमन उशिरा झाल्याने बोटींच्या माध्यमातून वन विभागाला अपेक्षित असलेले उत्पन्न तिजोरीत जमा झाले नाही. ‘फ्लेमिंगो दर्शन फेरी’च्या माध्यमातून फेब्रुवारी ते मे महिन्यांच्या दरम्यान सुमारे १३ लाख रुपयांचे उत्पन्न गोळा झाल्याची माहिती कांदळवन संरक्षण विभागाचे साहाय्यक वनसंरक्षक मकरंद घोडगे यांनी दिली. ठाण्याच्या खाडीत फ्लेमिंगो पक्ष्यांचे थवे दिसू लागल्याने पर्यटकांसाठी ऐरोली केंद्रातून १ नोव्हेंबरपासून फ्लेमिंगो दर्शन फे री सोडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंबंधीचे वेळापत्रक पुढील आठवडय़ामध्ये संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे घोडगे म्हणाले.

रोहित दर्शन असे

* ऐरोली केंद्रातून फ्लेमिंगो दर्शनासाठी ठाणे खाडीत सोडल्या जाणाऱ्या बोटींच्या साहाय्याने पर्यटकांना १० किलोमीटर खाडी परिसरात विहार करणाऱ्या फ्लेमिंगोचे दर्शन घडविले जाईल.

* यासाठी साधारण ४५ मिनिटांचा कालावधी लागेल.

* केंद्रामध्ये २४ व्यक्तींसाठी आसनव्यवस्था असलेल्या दोन बोटी आहेत. यासाठी प्रतिव्यक्ती ३०० रुपये आकारण्यात येतील, तर शनिवार-रविवारी फेरी शुल्क ४०० रुपये असेल.

* कुटुंब किंवा मित्रमंडळींसोबत एकत्र फ्लेमिंगो दर्शनाचा आनंद लुटण्यासाठी सात आसनी ‘कौस्तुभ’ नावाची बोट उपलब्ध आहे. मात्र त्यासाठी पर्यटकांना पाच हजार रुपये मोजावे लागतील.