27 November 2020

News Flash

शिवडी रुग्णालयाच्या शौचालयातील मृतदेह : पोलिसांनी ओळख पटवूनही पालिका अद्याप अनभिज्ञ

मृत्यू नैसर्गिक असून आत्महत्या नाही, असे केईएम रुग्णालय प्रशासनाने सांगितले.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

मुंबई : शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयातील शौचालयात १४ दिवस पडून राहिलेला मृतदेह हा सूर्यभान यादव (२७) या रुग्णाचा असून, नातेवाईकांनी त्याची ओळख पटविल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे, परंतु तो मृतदेह यादव याचा आहे की अन्य कुणाचा, याबाबत माहिती नसल्याचे सांगत पालिकेने हात वर केले आहेत.

गोरेगाव येथील २७ वर्षीय सूर्यभान यादव ३० सप्टेंबरला करोनाबाधित असल्याचा अहवाल घेऊन शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. ४ ऑक्टोबर रोजी हा रुग्ण बेपत्ता झाल्याचे समजले. त्याची तक्रार रुग्णालय प्रशासनाने पोलिसांत दिली. त्यानंतर तब्बल १४ दिवसांनी म्हणजे १८ ऑक्टोबरला करोना रुग्णांच्या वॉर्डजवळील शौचालयात एक मृतदेह आढळला, परंतु चेहरा स्पष्ट दिसत नसल्याने ओळख पटविता येत नव्हती. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठविला गेला.

मृत्यू नैसर्गिक असून आत्महत्या नाही, असे केईएम रुग्णालय प्रशासनाने सांगितले. मृत्यूनंतर बरेच दिवस मृताच्या नातेवाईकांपर्यंत पोहचता आले नाही. अखेर बुधवारी नातेवाईक केईएममध्ये आले आणि त्यांनी हा मृतदेह सूर्यभान याचा असल्याची ओळख पटविली. करोनाबाधित असल्याने मृतदेहही कुटुंबीयांकडे दिलेला नसून अंत्यसंस्कार करण्याची विनंती त्यांनी आम्हालाच केली, अशी माहिती र. ए. किडवाई मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील सोहोनी यांनी दिली. रुग्ण शौचास गेल्यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना रुग्णालय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

समिती स्थापन..

* संबंधित मृतदेह अज्ञात असून, वार्डमधील रुग्णाचा आहे की अन्य कोणाचा याबाबत माहिती समजू शकलेले नाही. या प्रकरणी चौकशी करण्यासाठी उपकार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली आहे. याचा अहवाल तीन ते चार दिवसांत सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

* याप्रकरणी रुग्णालयातील ४० कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदविले असून अंतर्गत चौकशी सुरू आहे. मृतदेहाची खात्री पटविल्याबाबत लेखी स्वरूपात केईएम किंवा पोलिसांनी अद्याप काहीही कळविले नसल्याचे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ललितकुमार आनंदे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 25, 2020 3:36 am

Web Title: body identified lying in the toilet of tb hospital in sewri zws 70
Next Stories
1 भाषा सहज येत नाही, घडवावी लागते!
2 सिटी सेंटर मॉलमधील अग्नितांडवाशी ३९ तास झुंज
3 शिथिलीकरणानंतर गृहविक्रीत वाढ
Just Now!
X