News Flash

बनावट संशोधन पत्रिकांमध्ये भारत आघाडीवर

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही बनावट संशोधन पत्रिकांमुळे भारताचे नाव खराब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

‘नेचर’च्या अहवालातून धक्कादायक बाब उघड

एकीकडे राज्यामध्ये माहितीची चोरी-मारी करून केल्या जाणाऱ्या पीएच.डी. आणि खोटय़ा संशोधनाचा पूर आलेला असताना आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरही बनावट संशोधन पत्रिकांमुळे भारताचे नाव खराब झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकाने केलेल्या पाहणीमध्ये सर्वाधिक बनावट आणि दर्जाहीन संशोधन नियतकालिके भारतात तयार होत आहेत. या पाहणीनुसार बनावट संशोधन पत्रिकांमध्ये प्रकाशित होणाऱ्या शोधनिबंधांपैकी जवळपास ३० टक्के शोधनिबंध हे भारतीय असल्याचे दिसून येत आहे.

नियम आणि दर्जा अशा दोन्हीची पत्रास न बाळगता पीएच.डी.सारखी संशोधनासाठी दिली जाणारी पदवी सर्रास वाटण्यात येत असल्याचे प्रकार यापूर्वीच उघड झाले आहेत. पदवी, वेतनवाढ मिळवण्यासाठी गल्लोगल्ली प्रकाशित होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय’ संशोधन नियतकालिकांमध्ये शोधनिबंध छापून आणले जातात. अशी आंतरराष्ट्रीय असल्याचा दावा करणारी नियतकालिके अगदी छोटय़ाशा गावातील महाविद्यालयाकडूनही प्रकाशित करण्यात येतात. या बनावट नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित करण्याच्या भारतीय पायंडय़ावर आता परदेशी संस्थांनीही बोट ठेवले आहे. गेल्याच वर्षी अभियंत्यांच्या एका जागतिक संघटनेने भारतातील हजारो प्राध्यापकांचे शोधनिबंध वाङ्मयचौर्य असल्यामुळे नियतकालिकांमध्ये प्रकाशित करण्यासाठी बंदी घातली होती. आता ‘नेचर्स’ या संशोधन नियतकालिकाने बनावट किंवा दर्जाहीन संशोधन नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधांचा अभ्यास केला. त्यामध्ये सर्वाधिक बनावट शोधपत्रिकांमध्ये  आपले निबंध प्रकाशित करण्याचे प्रमाण भारतात सर्वाधिक असल्याचे समोर आले आहे.

दिसते काय?

  • नेचरने जगभरातील जवळपास साडेतीन हजारापेक्षा अधिक शोधनिबंधांचा अभ्यास केला. त्यापैकी एक हजार ९०७ शोधनिबंध हे दर्जाहीन पत्रिकेमध्ये प्रकाशित झाल्याचे आढळून आले.
  • जगातील १०३ देशांतून प्रकाशित झालेले हे शोधनिबंध होते. जैववैद्यकीय विषयांवरील निबंधांचे प्रमाण त्यामध्ये अधिक होते. त्यातील २७ टक्के म्हणजे ५१४ निबंध हे भारतीय होते.
  • त्यामध्ये अगदी महाराष्ट्रातील संस्था, महाविद्यालयेही यामध्ये आहेत. ‘दर्जाबाबत संशोधनपत्रिकांच्या प्रकाशनाशी संपर्क साधल्यावर एखादा अपवाद वगळता कोणत्याच संस्थेने उत्तरे दिली नाहीत,’ असे नेचरने त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.
  • भारताखालोखाल अमेरिका (१५ टक्के), नायजेरिया (५ टक्के), इराण आणि जपान (प्रत्येकी ४ टक्के) या देशांतून बनावट संशोधन पत्रिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित करण्यात येत असल्याचे समोर आले आहे.

शोधनिबंधांतील त्रुटी कोणत्या?

  • शोधनिबंध प्रकाशित करताना आवश्यक असणारे तपशील नाहीत.
  • संशोधनाचा आर्थिक स्रोत जाहीर करण्यात आलेला नाही.
  • एका शोधनिबंधासाठी दोनपेक्षा अधिक, अगदी सहा ते आठ संशोधक किंवा सहलेखकांची नावे देण्यात आली आहेत.
  • वाङ्मयचौर्याचे प्रमाण सर्वाधिक
  • संशोधनपत्रिकांचे आवश्यक तपशील जाहीर केलेले नाहीत.
  • बोगस संशोधनपत्रिका असल्याचे अनेक संस्थांनी नमूद केल्यानंतरही त्यामध्ये वारंवार शोधनिबंध प्रकाशित होतात.

देशात ३२ हजार मान्यताप्राप्त संशोधन नियतकालिके

बनावट संशोधन नियतकालिकांमध्ये शोधनिबंध प्रकाशित करण्याच्या उद्योगाला आळा घालण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने मान्यताप्राप्त संशोधन नियतकालिकांची यादी प्रसिद्ध केली. त्यानुसार देशात तब्बल ३२ हजार ६५९ संशोधन नियतकालिकांना मान्यता देण्यात आली आहे. त्यातीलही अनेक नियतकालिके दर्जाहीन असल्याचे आक्षेप यापूर्वीही शिक्षणसंस्थांकडून घेण्यात आले आहेत. याशिवाय नोंद नसणारी संशोधन नियतकालिके अगणितच आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2017 2:41 am

Web Title: bogus research papers nature international research journal
Next Stories
1 अभियांत्रिकीला कलाभान
2 मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळतील
3 मार खाल्ला तर पदावरून काढेन!
Just Now!
X