निर्बंधांनंतर चित्रपटगृहात प्रदर्शित होणारा पहिला मोठा चित्रपट

मुंबई : गेले दीड वर्ष रखडलेले मोठ्या कलाकारांचे चित्रपट चित्रपटगृहांतून प्रदर्शित होण्यास आता सुरुवात होत असून अभिनेता अक्षयकुमारने आपल्या ‘बेलबॉटम’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे. निर्बंधांमुळे चित्रपटगृहे बंद असल्याने निर्मात्यांनी ओटीटी माध्यमाचा पर्याय जवळ केला होता. बेलबॉटम चित्रपटगृहांतून प्रदर्शित करण्याच्या निर्णयामुळे तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ बंद असलेल्या चित्रपटगृहांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी आधार मिळणार आहे.
चित्रपटगृहांवरील निर्बंध उठल्यानंतर प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटांमध्ये प्रामुख्याने अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या ‘सूर्यवंशी’ आणि रणवीर सिंगच्या ‘८३’ या दोन चित्रपटांची नावे आघाडीवर होती. गेल्या वर्षी प्रदर्शित होणारे हे चित्रपट करोनाकाळातील टाळेबंदी आणि निर्बंधांमुळे प्रदर्शनासाठी रखडले आहेत. निर्बंध शिथिल झाल्यानंतर किमान रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट पहिल्यांदा प्रदर्शित होईल असा ट्रेड विश्लेषकांचा अंदाज होता. या वर्षी एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला होता, मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे चित्रपटगृहांवर पुन्हा बंदी घातली गेल्याने दुसऱ्यांदा या चित्रपटाचे प्रदर्शन रखडले. आता हा चित्रपट ऑगस्टमध्ये प्रदर्शित होईल, अशी चर्चा सुरू आहे. या चित्रपटाविषयी निर्माते कोणता निर्णय घेतात याची वाट न पाहाता अक्षयने आपल्या दुसऱ्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख घोषित केली आहे.
‘बेलबॉटम’ या चित्रपटाचे चित्रीकरण अक्षयने गेल्या वर्षी टाळेबंदी शिथिल झाल्यानंतर परदेशात जाऊन पूर्ण केले होते. स्कॉटलंडमध्ये जैव सुरक्षा पद्धतीने या चित्रपटाचे चित्रीकरण केले असून अभिनेत्री वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी यांच्याही यात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट २७ जुलैला चित्रपटगृहातूनच प्रदर्शित होईल, असे अक्षयने स्पष्ट केले आहे.