करोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात निर्माण झालेल्या संकटाच्या परिस्थितीत अनेक बॉलिवूडच्या कलाकांरांनीही मदतीचा हात पुढे केला आहे. सलमान खान, शाहरुख खान, अक्षय कुमार असतील किंवा मराठी चित्रपट सृष्टीतीलही काही कलाकार असतील ते या संकट काळात सरकारच्या प्रशासनाच्या मदतीसाठी धावून आले आहेत. शाहरूख खाननंही आपल्या कार्यालयाची जागा मुंबई महानगरपालिकेला क्वारंटाइनसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर बॉलिवूडचा अभिनेता आणि व्यावसायिक सचिन जोशी हादेखील पुढे सरसावला आहे.
सचिन जोशी यांनं आपल्या ३६ खोल्यांचं एक आलिशान हॉटेल क्वारंटाइन रुग्णासाठी मुंबई महानगरपालिकेला देण्याचा निर्णय घेतला आहे. या हॉटेलचं नाव बिटेल असं असून ते मुंबईतील पवई परिसरात आहे. काही महिन्यांपूर्वी सचिन जोशीनं मद्यसम्राट विजय माल्ल्याचा गोव्यातील व्हिला ३७ कोटी रूपयांना खरेदी केला होता. त्यानंतर तो चर्चेत आला होता.

मुंबई हे गर्दी असलेलं शहर आहे. या ठिकाणी रुग्णालयांची संख्या कमी आहे. जेव्हा मुंबई महानगरपालिकेनं आमच्याकडे मदतीची विनंती केली त्यावेळी आम्ही त्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आम्ही त्यांना आम्ही आमचं हॉटेल क्वारंटाइन सेंटरसाठी दिलं आहे. संपूर्ण इमारत सॅनिटाईझ केली जात आहे आणि कर्मचारी वर्गालाही योग्य ती साधन सामग्री देण्यात आली आहे, असं त्यानं सांगितलं.

३७ कोटींना विला खरेदी
यापूर्वी स्टेट बँकेनं लिलावात काढलेला विजय माल्ल्याचा गोव्यातील किंगफिशर व्हिला सचिन जोशी यानं खरेदी केला होता. त्यापूर्वी बँकेनं तीन वेळा लिलावाचा प्रयत्न केला होता. परंतु त्यात अपयश आलं होतं. १२ हजार ३५० चौरस मीटरमध्ये हा बंगला परसलेला आहे. या बंगल्याची किंमत ८१-८५ कोटी रूपयांदरम्यान असल्याचं सांगण्यात आलं होतं. परंतु सचिन जोशीनं तो बंगला ७३ कोटी रूपयांना विकत घेतला.