हिंदी चित्रपटसृष्टीत नायक-नायिका कितीतरी मिळतील पण, खलनायक आणि चरित्रनायक म्हणून ज्या मोजक्या कलाकारांनी बॉलिवूडवर आपला ठसा उमटवला त्यात प्राण यांचे नाव मोठे होते. शुक्रवारी लीलावती रूग्णालयात रात्री साडेआठ वाजता अभिनयातील या सिकंदराने अखेरचा श्वास घेतला आणि बॉलिवूडचा ‘प्राण’ हरपला. आज शनिवारी दुपारी १२ वाजता त्यांच्यावर शिवाजीपार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
अमिताभ बच्चन, शत्रुघ्न सिन्हा यावेळी उपस्थित होते. मात्र, अनेक बॉलीवूड कलाकार अंत्यसंस्कारासाठी उपस्थित न राहिल्यामुळे अभिनेता रझा मुरादने नाराजी व्यक्त केली आहे. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, रितेश देशमुख, करण जोहर, मधुर भांडारकर, प्रिती झिंटा यांनी ट्विटरवरुन प्राण यांना श्रद्धांजली अर्पित केली आहे.
तब्बल सहा दशके हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘प्राण’ म्हणून मिरवणाऱ्या या अभिनेत्याला २००१ मध्ये ‘पद्मभूषण’ किताब देऊन सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी फिल्मफे अर पुरस्कार, राज कपूर पुरस्कार असे कित्येक मानाचे पुरस्कार मिळवले होते. भारतीय चित्रपटसृष्टी शंभर वर्षांची वाटचाल पूर्ण करत असतानाच  प्राण यांना दादासाहेब फाळके जीवनगौरवसारख्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवले जावे, हाही एक छान योगायोग होता.