अन्नदाता म्हणून ज्या शेतकऱ्याकडे मोठ्या अदबीनं पाहिलं जातं त्याच शेतकऱ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मुंबईच्या दिशेने यावं लागलं आहे. ६ मार्चपासून नाशिकहून निघालेला शेतकऱ्यांचा मोर्चा रविवारी मुंबईत दाखल झाला. रविवारी रात्री उशिरा मोर्चेकरी आझाद मैदानावर दाखल झाले आणि सर्वत्र या अन्नदात्यांच्या एकजुटीला सलाम करण्यात आला. फक्त मुंबईकरच नव्हे तर कलाविश्वातूनही या मोर्चाला पाठिंबा देण्यात येत आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत मराठीचं प्रतिनिधीत्त्व करणारा अभिनेता रितेश देशमुख याने ट्विट करत या मोर्चाचं समर्थन करत ‘जय किसान’ असा नाराही दिला आहे.

‘जवळपास ५० हजार शेतकरी त्यांच्या शेतमालाला योग्य हमीभाव मिळावा म्हणून १८० किलोमीटरचा पायी प्रवास करुन इथे आले आहेत. या मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यात त्यांनी फक्त आणि फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांमध्ये कोणतीही अडचणीची परिस्थिती उदभवू नये याची काळजी घेत रात्रीच आपला प्रवास केला. त्यांच्या या वृत्तीला आणि भूमिकेला माझा सलाम…’, असं ट्विट करत रितेशने ‘जय किसान’ या नाऱ्याचा उल्लेखही केला.

वाचा : राजकारण बाजूला सारून शेतकऱ्यांच्या शांततापूर्ण मोर्चाला साथ देऊया- हुमा कुरेशी

Kisan Long March: हो शेतकरी आजारी आहे; आझाद मैदानावर डॉक्टरांचे चेकअप कॅम्प्स

बळीराजाप्रती नेहमीच आपली आत्मियता दाखवत करत त्यांच्याप्रती रितेशने नेहमीच आदराची भावना व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या या भव्य मोर्चानेच सध्या अनेकांचं लक्ष वेधलं आहे. एकिकडे हुमा कुरेशी आणि रितेश देशमुख या कलाकारांनी शेतकऱ्यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. पण, या साऱ्यात मराठी कलाविश्वातून अजूनही सेलिब्रिटी याविषयी पुढे येऊन आपली भूमिका का मांडत नाहीयेत हाच प्रश्न नेटकऱ्यांनी मांडला आहे.