18 January 2021

News Flash

महापालिकेकडून गंभीर आरोप होत असतानाच सोनू सूदने घेतली शरद पवारांची भेट

महापालिकेकडून गंभीर आरोप होत असतानाच भेट घेतल्याने चर्चा

मुंबई महापालिका बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करत असल्याने सध्या चर्चेत असलेला अभिनेता सोनू सूद बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचला. सोनू सूदने शरद पवार यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे मात्र गुलदस्त्यात आहे. पण सध्या महापालिकेकडून गंभीर आरोप होत असल्याने सोनू सूदने याविषयी चर्चा केल्याची शक्यता आहे.

‘कारवाईनंतरही सोनू सूदकडून वारंवार बेकायदा बांधकाम’

बेकायदा बांधकामाप्रकरणी वारंवार नोटीस बजावून आणि कारवाई करूनही अभिनेता सोनू सूदने कायद्याचे उल्लंघन करणे थांबवले नाही. त्यामुळे तो वारंवार कायदे मोडणारा गुन्हेगारच आहे, असा दावा पालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयात केला. तसंच सोनूला करवाईपासून कोणताही दिलासा देऊ नये, अशी मागणीही केली.

पालिकेच्या कारवाईविरोधात सोनू सूदने उच्च न्यायालयात धाव घेतली असून आपण कोणत्याही प्रकारचं बेकायदा बांधकाम केलेलं नाही, असा दावा त्याने केला आहे. तसंच पालिकेने कारवाईबाबत बजावलेली नोटीस रद्द करण्याची मागणी केली आहे. त्याच्या आरोपांत तथ्य नसल्याचा दावा करणारे तसेच त्याच्याकडून कारवाईनंतरही बेकायदा बांधकाम केले जात असल्याचा दावा करणारे प्रतिज्ञापत्र पालिकेने मंगळवारी अड. जोएल कार्लस यांच्यामार्फत केले.

त्यानुसार, मंजूर आराखडय़ात विनापरवानगी बदल करून तसेच निवासी इमारतीचं हॉटेलमध्ये रूपांतर करून सोनू सूदला त्यातून नफा कमवायचा आहे. त्यामुळेच बेकायदा बांधकामावर दोनवेळा कारवाई केल्यावरही त्याने ते पुन्हा बांधलं. तिथे विनापरवाना हॉटेलही सुरू केलं. बेकायदा बांधकामाबाबतची त्याची वृत्ती सराईत गुन्हेगारासारखीच आहे, असा दावा पालिकेने केला आहे.

आपण कोणतेही बेकायदा बांधकाम केलेले नाही वा जे काही बदल केले आहेत ते महाराष्ट्र प्रादेशिक नगर नियोजन कायद्यानुसार केले आहेत हा सोनूचा दावा बेकायदा बांधकामाचे संरक्षण करण्यासाठी आहे. उलट त्याने मंजूर आराखडय़ाचे उल्लंघन करून काम केलं आहे. सोनूला निवासी इमारतीची व्यायावसायिक इमारतीत रूपांतर करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. तसंच त्याला हॉटेल चालवण्याचा परवानाही देण्यात आलेला नाही, असा दावासुद्धा पालिकेने केला आहे. जुहू येथील ज्या शक्तीसागर या निवासी सहा मजली इमारतीचे हॉटेलमध्ये रूपांतर करण्यात आले, ती त्याच्या वा त्याची पत्नी सोनालीच्या मालकीची असल्याची कोणतीही कागदपत्रे नाहीत, असंही पालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 13, 2021 11:05 am

Web Title: bollywood actor sonu sood meets ncp chief sharad pawar sgy 87
Next Stories
1 कोलकात्यातून पळालेली महिला सापडली वाशीमध्ये
2 मुंबईकरांसाठी या वर्षातील सर्वात मोठी दिलासादायक बातमी
3  ‘कोविशिल्ड’च्या ९ लाख कुप्या प्राप्त
Just Now!
X