सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या ५४ वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

श्रीदेवी यांना लहानपणापासूनच अभिनय व नृत्याची आवड होती. ४ वर्षांची असतानाच ‘थुनीवावन’ या चित्रपटातुन एक बाल कलाकार म्हणुन त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरवात केली. पुढे १९७१ साली ‘पूमबत्ता’ या एका मल्याळम चित्रपटात त्यांनी अभिनय केला. दरम्यान त्यांना ‘केरला स्टेट फिल्म’ यांसारख्या अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.

पुढे जबरदस्त अभिनय शैलीच्या जोरावर श्रीदेवीने १९७९ साली ‘सोलावा सावन’ या चित्रपटातुन आपल्या हिंदी अभिनय कारकिर्दिची सुरवात केली. खरेतर श्रीदेवी ज्युली या सिनेमातीही झळकली होती. मात्र त्यात तिची भूमिका छोटी होती. सोलवा सावननंतर मात्र तिने मागे वळून पाहिलेच नाही.  त्यानंतर ‘सदमा’, ‘हिम्मतवाला’, ‘जाग उठा इन्सान’, ‘अक्लमंद’, ‘इंकलाब’, ‘तोहफा’, ‘सरफ़रोश’, ‘बलिदान’, ‘नया कदम’, ‘नगीना’, ‘घर संसार’, ‘नया कदम’,’मकसद’, ‘सुल्तान’, ‘हल्ला बोल’, ‘इंग्लिश विंग्लिश’ यांसारख्या तब्बल १०० हुन अधिक चित्रपटात त्यांनी काम केले आहे. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. अलिकडे आपली मुलगी ‘जान्हवी कपूर’ला अभिनयाचे धडे देण्यात त्या व्यस्त होत्या.

९० च्या दशकात अभिनेत्री माधुरी दीक्षित आणि श्रीदेवी यांच्यात एकप्रकारे पुढे जाण्यासाठी चढाओढ लागून होती. मात्र श्रीदेवीने आपले नंबर वनचे स्थान कायम अबाधित ठेवले. माधुरी आणि श्रीदेवी या दोघींनाही अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. खुदा गवाह या सिनेमात श्रीदेवी आणि अमिताभ एकत्र आले. त्यांचा हा सिनेमाही चांगलाच गाजला. ऋषी कपूरसोबतचा चाँदनी सिनेमा असेल किंवा अनिल कपूरसोबत केलेले लम्हे, जुदाई, रुप की रानी चोरो का राजा सारखे सिनेमा असतील, श्रीदेवीने आपल्या अभिनय कौशल्याने कायमच स्वतःची छाप त्या भूमिकांवर सोडली. ५४ वर्षे हे काही जग सोडून जाण्याचे किंवा निधनाचे वय नाही. मात्र नियतीच्या मनात कायम वेगळे काहीतरी असते असे म्हणतात तसेच ते श्रीदेवीच्या बाबतीतही घडले. तिने जगाचा निरोप घेतला आहे. एखादी सुरैल मैफल सुरु असावी आणि भैरवी सुरु होण्याआधीच अचानक संपावी तसे काहीसे घडल्याची भावना या बातमीमुळे प्रत्येकच सिनेरसिकाच्या मनात असणार आहे.