ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनची घोषणा

मुंबई : पुलवामा हल्ल्याच्या पाश्र्वभूमीवर ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’ने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्यात आल्याचे सोमवारी जाहीर केले आहे.

आम्ही देश आणि त्याच्या सुरक्षेला प्राधान्य देतो. त्यामुळे अधिकृतरीत्या पाकिस्तानी कलाकारांवर बॉलीवूडमध्ये बंदी घालण्यात येत असल्याचे संघटनेने पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.

‘पुलवामामध्ये केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. यापुढे एकाही पाकिस्तानी कलाकाराला बॉलीवूडमध्ये काम करता येणार नाही. जो कोणी पाकिस्तानी कलाकारांना काम देईल, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल’, असेही पत्रकात म्हटले आहे.

‘फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉइज’ आणि ‘इंडियन फिल्म अँड टेलिव्हिजन डायरेक्टर्स असोसिएशन’ या दोन महत्त्वाच्या संघटना आणि त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या २८ संघटनांनी रविवारी, १७ फेब्रुवारीला पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ‘ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशन’नेही पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्याचे जाहीर केले. त्यामुळे सिंटा म्हणजेच ‘सिने अँड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन’ आणि ‘प्रोडय़ुसर्स गिल्ड ऑफ इंडिया’ या दोन संघटना यांसर्भात काय भूमिका घेतात, याविषयी उत्सुकता आहे.

मराठी कलाकारांकडून आज श्रद्धांजली

मराठी नाटय़सृष्टी आणि सिने कलावंतांच्या वतीने शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज, १९ फेब्रुवारीला सायंकाळी ५.३० वाजता, यशवंत नाटय़मंदिर, माटुंगा येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले आहे.