बॉलिवूड अभिनेत्री रकुल प्रीत सिंह हिची आज अमली पदार्थ विरोधी पथक (एनसीबी) चौकशी करणार आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या चौकशीमध्ये बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरण समोर आलं आहे. यामध्येच अभिनेत्री रकुल प्रीतसह बॉलिवूडमधील काही दिग्गज अभिनेत्रींची नावंदेखील उघड झाली आहेत. त्यामुळेच एनसीबीने बुधवारी रकुल प्रीत, दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी समन्स बजावले होते. त्यानुसार, आज रकुलची चौकशी होणार आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनसीबी) बुधवारी अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंह यांना समन्स बजावून चौकशीस हजर राहण्याची सूचना केली. मात्र आपल्याला एनसीबीचे समन्स मिळाले नाहीत असं रकुलने माध्यमांना सांगितलं होतं. मात्र, एनसीबीने यावर भाष्य करत रकुलला समन्स मिळाल्याचं स्पष्ट केलं. विशेष म्हणजे एनसीबीने स्पष्ट केल्यानंतर थोड्याच वेळात रकुलने समन्स स्वीकारले. तसंच तिने घराचा नवीन पत्तासुद्धा सांगितल्याचं एनसीबीकडून सांगण्यात आलं. त्यामुळे आज शुक्रवारी (२५ सप्टेंबर) रकुलची चौकशी होणार आहे. रकुलसोबतच दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश हिचीदेखील आजच चौकशी होणार आहे. तर दीपिकाची शनिवारी (२६ सप्टेंबर) चौकशी करण्यात येणार आहे.

दरम्यान, सुशांत मृत्यू प्रकरणातील प्रमुख संशयित, अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चौकशीदरम्यान सारा, रकुल यांचा उल्लेख केला होता. सुशांतच्या लोणावळ्यातील शेतघरी केलेल्या चौकशीत एनसीबी पथकाला श्रद्धाबाबत माहिती मिळाली, तर बॉलीवूडसह दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अनेक तारे-तारकांशी जुळलेल्या ‘क्वान टॅलेंट मॅनेजमेंट’ कंपनीची कर्मचारी करिश्मा प्रकाश या तरुणीच्या चौकशीनंतर एनसीबीने दीपिकाला समन्स जारी केले.