बॉलिवूडमधील चित्रपट फायनान्सर आणि बांधकाम व्यवसायिक युसूफ लकडावाला यांना ईडीनं अटक केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई केली असून वारंवार नोटीस बजावून देखील ते चौकशीसाठी हजर न राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं देखील ईडीकडून सांगण्यात आलं आहे. ५० कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप युसूफ लकडावाला यांच्यावर असून त्यांच्यावर फसवणूक, गैरव्यवहार आणि अवैधपणे जमीन बळकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबादचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या वंशजांच्या मालकीची खंडाळ्यातील जमीन बेकायदेशीररित्या लाटल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. ईडीनं त्यांना स्थानिक न्यायालयात हजर केलं असता त्यांची २ जूनपर्यंत ईडीच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

 

यासंदर्भात ईडीनं परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. “आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास करताना युसूफ लकडावाला यांच्या अनेक मालमत्तांवर छापे टाकण्यात आले. यामध्ये काही महत्त्वाची कागदपत्र आणि इलेक्ट्रॉनिक डाटा जप्त करण्यात आला आहे”, अशी माहिती ईडीकडून देण्यात आली आहे.

याशिवाय युसूफ लकडावाला यांच्या नावे अनेक बनावट कंपन्या देखील असल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे. “या कंपन्यांच्या बँक खात्यांची चौकशी केल्यानंतर त्यांना व्यवसायात कोणताही नफा होत नसल्याचं दिसून आलं. मात्र, तरीदेखील या खात्यांवरून कोट्यवधींचे व्यवहार करण्यात आले आहेत. याच बनावट कंपन्यांचा वापर करून बेहिशेबी पैसा लपवण्यात आला. नंतर हाच पैसा कोट्यवधींची मालमत्ता खरेदी करण्यासाठी वापरला गेला. हे व्यवहार करण्यासाठी या कंपन्यांच्या माध्यमातून या प्रकरणातल्या इतर आरोपींना कमिशन देखील देण्यात आल्याचं समोर आलं आहे”, असं ईडीनं स्पष्ट केलं आहे.

हैदराबादचे नवाब हिमायत नवाज जंग बहादूर यांच्या वंशजांच्या मालकीची खंडाळ्यातील जमीन आपल्या नावावर करण्यासाठी लकडावाला यांनी सरकारी अधिकाऱ्यांना ११.५ कोटी रुपयांची लाच दिल्याचाी माहिती ईडीनं दिली आहे. लकडावाला यांनी संबंधित जमीन आपले वडील एम. ए. लकडावाला यांनी १९४९ साली खरेदी केली होती आणि नंतर १९६८ साली ती आपल्या नावावर केली असं दाखवणारी कागदपत्र तयार करवून घेतली. तसेच, लोणावळा नोदणी कार्यालयातील मूळ कागदपत्रे देखील नष्ट करण्याचा प्रयत्न लकडावाला यांनी केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.