दिल्लीत पाच वर्षांच्या मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाचे पडसाद मुंबईतही उमटले. या घटनेचा निषेध करण्यासाठी गोरेगाव, मालाड परिसरांत ‘मेणबत्ती मोर्चा’ काढण्यात आला होता. तसेच बॉलीवूडमध्येही या घटनेच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत होत्या. सुपरस्टार अमिताभ बच्चन, शिल्पा शेट्टी यांच्यासह अनेकांनी या घटनेचा कडक शब्दांत निषेध केला.
मालाड पूर्व येथील हनुमान मंदिरापासून गोरेगाव (पूर्व) येथील वाघेश्री मंदिरापर्यंत मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला होता. या परिसरातील सुमारे ३०० स्थानिक रहिवाशी त्यात सहभागी झाले होते. बलात्कार पीडित मुलीवर सध्या दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती सुधारावी यासाठी मोर्चेकरी प्रार्थना करीत होते. त्याचबरोबर आरोपीला तातडीने फासावर चढवावे, अशी मागणीही या वेळी नागरिक करीत होते. तिच्या मदतीसाठी मुंबईत मोहीम राबविण्यात येणार असल्याचे टी. एन. मिश्रा यांनी सांगितले.
‘‘पाच वर्षांच्या लहान मुलीवर बलात्कार करुन तिला ठार मारण्याचा प्रयत्न करणे यापेक्षा भयंकर काही असूच शकत नाही. ही घटना मन गोठवून टाकणारी आहे. अशा नराधमाला काय बोलणार, त्याला धड जनावरही म्हणू शकत नाही. जनावरेही निसर्गाच्या नियमानुसार वागतात,’’ असे अमिताभ यांनी ब्लॉगवर म्हटले आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही या घटनेचा निषेध करीत त्या मुलीच्या आई-वडिलांबाबतीत असंवेदनशीलता दाखवणाऱ्या पोलिसांचा धिक्कार केला. दिल्ली पोलिसांनी निषेध करणाऱ्या मुलीच्या श्रीमुखात भडकवल्याबद्दल तिने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.