मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला अभिनेता सलमान खान याला बुधवारी येथील सत्र न्यायालयाने पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. सलमानवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, शिक्षा जाहीर होताच सलमानच्या वकिलांनी उच्च न्यायालयात धाव घेत हंगामी जामिनासाठी अर्ज दाखल केला. उच्च न्यायालयानेही सलमानला दोन दिवसांचा हंगामी जामीन मंजूर केल्याने त्याची कारागृहातील रवानगी तूर्तास टळली आहे. आता उद्या, ८ मे रोजी सलमानच्या जामिनावरील सुनावणी होणार आहे.
२८ सप्टेंबर २००२ रोजी सलमानने मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवून अमेरिकन बेकरीनजीकच्या पदपथावर झोपलेल्या चारजणांना चिरडले होते. त्यातील एकाचा मृत्यू झाला तर अन्यांना कायमचे अपंगत्व प्राप्त झाले. या प्रकरणी गेल्या १३ वर्षांपासून येथील सत्र न्यायालयात सलमानवर सदोष मनुष्यवधाचा खटला सुरू होता. गेल्याच आठवडय़ात सर्व युक्तिवाद संपुष्टात आल्यानंतर बुधवारी या प्रकरणाचा निकाल जाहीर झाला. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे हे सलमानला दोषी ठरवून शिक्षा सुनावणार की त्याची निर्दोष मुक्तता करणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. शिवाय खटल्याचा निकाल सकाळी सव्वाअकरा वाजता देण्याचे न्यायालयाने आधीच स्पष्ट केल्याने ११ वाजल्यापासूनच निकाल काय येणार याची चर्चा सुरू झाली होती. जाहीर केल्यानुसार अखेर सकाळी सव्वाअकरा वाजता आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या सलमानला तो सदोष मनुष्यवधाच्या आरोपासह त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या सगळ्या आरोपांमध्ये दोषी ठरवल्याचे सांगत न्यायालयाने सलमानला पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.

सलमानला अश्रू अनावर
आरोपीच्या पिंजऱ्यात उभ्या असलेल्या सलमानला निकाल ऐकताच अश्रू अनावर झाले. शिक्षेबाबत काय म्हणणे आहे, अशी विचारणा केली असता, ‘मी त्यावेळी गाडी चालवत नव्हतो. मात्र, न्यायाच्या दृष्टीने जो काही निर्णय द्याल, तो मान्य आहे. माझ्यातर्फे माझे वकीलच भूमिका मांडतील’, असे सलमानने स्पष्ट केले.

सलमानवर लावण्यात आलेले कलम
* भादंवि कलम ३०४ भाग दोन (सदोष मनुष्यवध)
* भादंवि कलम २७९ (बेदरकारपणे गाडी चालवणे)
* भादंवि कलम ३३७ आणि ३३८ (प्राणघातक इजा पोहोचवणे)
* भादंवि कलम ४२७ (मालमत्तेला हानी पोहोचेल असे दुष्कृत्य)
* मोटर वाहन नियम कायदा, १९८८, कलम ३४ (अ) (ब) कलम १८१ अनुसार नियमांचे पालन न करता वाहन चालवणे आणि कलम १८५ अनुसार मद्यपान केल्यानंतर वेगाने गाडी चालवल्यास वाहन चालवण्याचा परवाना रद्द होतो.

हंगामी  जामीन  असा  मिळाला
* सलमानच्या वकिलांनी तातडीने उच्च न्यायालयात धाव घेत हंगामी जामिनासाठी अर्ज दाखल केला.
* अ‍ॅड्. हरिश साळवे दिल्लीहून काही वेळातच सलमानच्या युक्तिवादासाठी न्यायालयात दाखल
* सलमानला तपशीलवार निकालपत्राची प्रत देण्यात आलेली नसल्याने त्याला हंगामी जामीन मंजूर करण्याची साळवे यांची उच्च न्यायालयाला विनंती
* १९९३ सालच्या बॉम्बस्फोट खटल्यातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा दाखला साळवे यांनी दिला
* सलमानला ताब्यात घेण्यात आले आहे का, अशी विचारणा उच्च न्यायालयाकडून विचारणा
* सत्र न्यायालयाने त्याला न्यायालयातच पाच वाजेपर्यंत बसून राहण्याचे आदेश दिल्याचे साळवे यांचे उत्तर
* निकालाची प्रत गुरुवार अथवा शुक्रवारी मिळणार असल्याची माहिती उच्च न्यायालयाला देण्यात आली
* सरकारी वकील संदीप शिंदे यांनीही सलमानला निकालाची प्रत देण्यात आली नसल्याचे मान्य केले.
* निकालाची प्रत न मिळताच अपिलाला क्रमांक कसा मिळाला असा उच्च न्यायालयाचा सवाल
* निकालाची प्रत तयार नव्हती, तर सत्र न्यायालयाने निकाल उद्या किंवा त्यानंतर द्यायला हवा होता, असा शेरा उच्च न्यायालयाने मारला.
* सुनावणी करताना न्यायमूर्ती अभय ठिपसे यांनी खटल्यादरम्यान सलमान हा जामिनावरच होता आणि कारणमीमांसा असलेली निकालाची प्रत त्याला अद्याप मिळाली नसल्याने काही वेळासाठी त्याला हंगामी दिलासा दिला जाऊ शकतो, असे नमूद करत सलमानला दोन दिवसांचा हंगामी जामीन मंजूर केला.
* त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निकालानंतर अवघ्या दोन तासांत सलमानला जामीन मंजूर झाला.