चित्रपटसृष्टीतील नामवंतांची उपस्थिती; पोस्टर, घोषणांमधून जेएनयू हल्ल्याखेरीज अन्य मुद्दय़ांनाही वाचा

मुंबई : दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात रविवारी झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ त्याच रात्रीपासून मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात ठिय्या मांडून बसलेल्या तरुणाईचा उत्साह सोमवारी रात्रीही कायम होता. शहराच्या कानाकोपऱ्यातून दाखल होणारे आंदोलकांचे जथ्थे, चित्रपटसृष्टीतील नामवंतांची उपस्थिती, जमिनीवरच बैठक मांडून पोस्टर रंगवण्यात मग्न मुले आणि ‘जेएनयू’खेरीज सुधारित नागरिकत्व कायदा आणि अन्य मुद्दय़ांवर सुरू असलेल्या घोषणा यामुळे हा परिसर सोमवारी रात्रभर गजबजलेला होता.

सोमवारी दिवसभर मुंबईत अनेक ठिकाणी निदर्शने सुरू होती. पण रात्री शहरातील तरुणाईचे गट गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने येऊ लागले. रात्र वाढू लागली तशी ही गर्दी आणखीनच वाढू लागली. दिवसभर थकलेले काही जण घरी जात होते, तर काही जण नव्या उत्साहाने येत होते. पन्नास-साठचे दोन-तीन समूह घोषणा आणि गाण्यांमधून निषेधाचे सूर उमटवत होते. रात्र वाढली तरी ना तरुणाईचा उत्साह कमी झाला ना त्यांना जेवण, चहा, पाणी देणाऱ्या कार्यकर्त्यांचा. सुमारे तीन-चारशेच्या या समूहासाठी परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जेवणाची सोय केली होती. दिवसभर सुलभ शौचालयाचा वापर होता, पण रात्रीसाठी परिसरात पालिकेची फिरती शौचालयेदेखील दाखल झाली.

रात्री एकच्या सुमारास निर्माता-दिग्दर्शक अनुराग कश्यप आले. गर्दीत बैठक मारून शांतपणे घोषणांना प्रतिसाद देऊ लागले. सुमारे तासभर अनुराग याच परिसरात थांबले होते. त्याचबरोबर संगीतकार विशाल ददलानी हेदेखील गर्दीत येऊन बसले. चित्रपटांतील समता, बंधुभाव आणि देशप्रेम व्यक्त करणाऱ्या गाण्यांनी यावेळी जोर पकडला.

रात्र वाढू लागली तरी उत्साह कमी होत नव्हता. त्याच वेळी कोणी तरी एक भलीमोठी ताडपत्री आणून या परिसरात अंथरली. गर्दीचा एक मोठा भाग भाषणे ऐकत होता, तर छोटय़ा समूहाने अनेक जण ताडपत्रीवर बसून गाणी गात होते. मंगळवारी सकाळी पोलिसांनी सर्वाना आझाद मैदानावर नेईपर्यंत बहुतांश जण गेटवेवरच होते.

पोस्टर रंगवण्यात दंग

पन्नास-शंभर कार्डबोर्ड, कोरे कागद, रंगाचे डबे, ब्रश आणि स्केचपेन्स असे बरेच साहित्य गेटवेवरील एका कोपऱ्यात जमा झाले होते. अनेक तरुण-तरुणी येथे मांडा ठोकून बसल्या होत्या. प्रत्येकाच्या कल्पनाशक्तीला जणू बहरच आला होता. अतिशय तिरकस भाषेत एकेक फलक तयार होत होते. ‘जेएनयूवरील हल्ला ही घटना इतकी विदारक आहे की, मी नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राईम सोडून येथे आले,’ अशा आशयाचा फलक जवळच्या रस्तारोधकावर लटकावला होता. गेटवेजवळ लावलेले सारे दुभाजकच विविध फलकांनी भरले होते. सध्याची परिस्थितीच अशी आहे की रोजच आंदोलन करावे लागणार. ही भावना व्यक्त करणारा ‘रोज यही मिलेंगे’ असे एका फलकावर लिहिले होते. तर ‘काऊ इट माय डॉक्युमेन्ट’ असे सांगत राष्ट्रीय नागरिक नोंदणीवर देखील भाष्य केले होते.