@nirajcpandit

‘हम आप के है कौन’मधील माधुरी दीक्षितचा ड्रेस.. ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातील फ्रेंड्सची टोपी.. या आणि अशा अनेक चित्रपटांतील कलाकारांच्या स्टाइल्सनी एक काळ गाजवला होता. आजही मधून मधून असा काळ येतो आणि जातो. चित्रपटांमध्ये कलाकारांच्या अंगावर दिसणारे कपडे कधीतरी आपणही घ्यावे असे अनेकांना वाटत असते. मात्र हे कपडे कुठे मिळतात आणि ज्या काही ठिकाणी मिळतात तेथे त्याची किंमत काय असेल असे एक ना अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. असचे प्रश्न इंदूर येथे राहणारा बॉलीवूडप्रेमी विनायक कल्याणी याला पडू लागले. मग त्याने यावर काम करण्यास सुरुवात केली आणि चित्रपटांमध्ये दिसणारे सर्व कपडे इतकेच नव्हे तर इतर उत्पादने सामान्यांच्या खिशाला परवडतील अशा किमतीत उपलब्ध करून द्यायचा चंग बांधला. यातूनच www.bollywoo.ooo या संकेतस्थळाचा जन्म झाला. नुसतेच संकेतस्थळ नव्हे तर एक नव्या व्यवसायाचा उदय झाला.

इंदूरमध्ये राहणारा विनायक देशातील लाखो तरुणांप्रमाणेच बॉलीवूडचा चाहता. थिएटरमध्ये आलेला एकही चित्रपट सोडायचा नाही. चित्रपटाचा रसास्वाद घेताना केवळ त्यातील पात्रांचा विचार न करता चित्रपटात दिसणारी ठिकाणे, कलाकारांचे कपडे याचे त्याला विशेष आकर्षण होते. दिल्लीत शालेय शिक्षण पूर्ण झाल्यावर फिलाडेल्फिया येथे जाऊन त्याने वित्तीय शिक्षण घेतले. तेथून परतल्यावर बॉलीवूडचा किडा त्याच्या डोक्यात होतात. मग त्याने बॉलीवूडमधील जानेमाने फॅशन डिझायनर नीता लुल्ला, मनीष मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली. त्यांनी डिझाइन केलेले कपडे नेमके जातात कुठे. यावर ते खूप महागडय़ा किमतीला विकले जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे कलाकारांनी घातलेले कपडे जसेच्या तसे आपल्याला परिधान करण्यास मिळावे यासाठी विनायकने काम सुरू केले. विनायकला केवळ नक्कल करावयाची नव्हती. यामुळे चित्रपटात दिसणारे कलाकारांचे कपडे आणि इतर उत्पादने विकण्यासाठी http://www.bollywoo.ooo ¹ाा संकेतस्थळाची निर्मिती केली असून या माध्यमातून विक्री करण्यास परवानगी मिळावी म्हणून त्याने यशराज फिल्म्सपासून ते बॉलीवूडमधील बडय़ा चित्रपट निर्मात्यांची भेट घेऊन त्यांना ही संकल्पना समजावून सांगितली. त्यांनाही ही संकल्पना आवडली आणि कलाकारांनी परिधान केलेले कपडे सामान्यांना आता अवघ्या ६४० रुपयांपासून उपलब्ध होऊ लागले आहेत. कपडय़ांचे उत्पादन करण्यासाठी मुंबई आणि लुधियाना येथे त्याने उत्पादन केंद्र सुरू केले आणि इंदूर येथून सर्व माल देशभर वितरित करण्याची व्यवस्था निर्माण केली.

विनायकला हा व्यवसाय अधिकृतपणे करायचा होता यामुळेच त्याने सर्व चित्रपट निर्माते आणि वितरक कंपन्यांशी सहकार्य करार केला आहे. या करारानुसार चित्रपटाच्या तीन महिने आधीपासून विनायक चित्रपटातील कपडे तयार करण्याचे काम सुरू करतो. म्हणजे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाल्यावर ती सर्व उत्पादने या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध होतात. ही उत्पादने जेव्हा चाहत्यांच्या घरी पोहोचतात तेव्हा त्यासोबत संबंधित कलाकाराच्या स्वाक्षरीचे एक पत्रही असते. तसेच चित्रपटाच्या संकल्पनेला साजेसे पॅकिंगही केलेले असते. यामुळे आपण दहा ते पंधरा हजार रुपयांचा पेहराव विकत घेतल्याची भावना सामान्यांना वाटावी असा मानस असल्याचे विनायक सांगतो. याचबरोबर कपडय़ांच्या किमती कमी असल्या तरी त्याचा दर्जा मात्र तितकाच चांगला ठेवल्याचे विनायक सांगतो. यामागचे गमक उलगडण्यास मात्र त्याच्यातील व्यावसायिकाने नकार दिला.

संकेतस्थळावर पेटंटही

या संकेतस्थळात प्रथमच व्हिडीओ पाहताना आपल्याला पाहिजे तो ड्रेस विकत घेण्याचे तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करणारे हे पहिलेच संकेतस्थळ असून याचे स्वामित्व हक्कही कंपनीकडे असल्याचे विनायक सांगतो. चित्रपटातील गाणी, टीझर पाहता पाहता जर एखाद्याला कपडे अथवा एखादे उत्पादन आवडले तर तिथेच क्लिक करून ते खरेदी करण्याची सुविधाही देण्यात आली आहे.

गुंतवणूक आणि उत्पन्नस्रोत

सध्या या व्यवसायात ओळखीच्या व्यक्तींकडून उभारलेली गुंतवणूक करण्यात आली आहे. तसेच याचे थेट उत्पन्न हे विक्रीतून आहे. ज्या चित्रपटाच्या कंपनीची उत्पादने विकली जात आहेत त्या कंपनीला सात ते बारा टक्क्यांपर्यंत वाटा दिला जातो. हा वाटा चित्रपटाचे कथानक, कलाकार आदी बाबींचा विचार करून निश्चित केला जातो.

भविष्यातील वाटचाल

भविष्यात केवळ चित्रपटातील कलाकारांचे कपडे अथवा त्या संदर्भातील उत्पादने विकण्याचा मानस नसून चित्रपटात दाखविल्या जाणाऱ्या पर्यटनस्थळांवर पर्यटनाच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस असल्याचे विनायक सांगतो. यासंदर्भातील प्रक्रिया सुरू असून ती लवकरच पूर्ण होईल अशी अपेक्षाही विनायकने व्यक्त केली.

नवउद्यमींना सल्ला

सध्या सरकारची धोरणे ही पोषक असून याचा फायदा अधिकाधिक तरुणांनी घ्यावा. पण हे करत असताना अधिक सजक असणे गरजेचे आहे. सरकारनेही अशा तरुणांना मार्गदर्शन करण्यासाठी बडय़ा उद्योगपतींच्या मार्गदर्शनाखाली एक व्यवस्था असावी अशी अपेक्षाही विनायकने व्यक्त केली.

niraj.pandit@expressindia.com