कोईम्बतूर-गुजरात एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याच्या अफवेने रविवारी सुरक्षा रक्षकांची चांगलीच धावपळ झाली. ही गाडी गोवा रेल्वे स्थानकांत आली असताना सकाळच्या सुमारास एका व्यक्तीने आरपीएफच्या कन्ट्रोल रुमला गाडीत बॉम्ब असल्याची माहिती दिली होती. त्यानुसार, आरपीएफ आणि जीआरपीने संबंधीत एक्स्प्रेस तीन ठिकाणी थांबवत पुन्-पुन्हा गाडीची तपासणी केली मात्र, यात कोणतीही बॉम्ब सदृश्य संशयास्पद वस्तू आढळून आली नाही.

पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, कोईम्बतूरहून गुजराला जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये बॉम्ब असल्याची माहिती देणारा फोन आरपीएफच्या कन्ट्रोल रुमला आला. त्यानंतर ही गाडी मडगाव स्थानकात थांबवण्यात आली आणि तिच्या सर्व डब्यांची कसून तपासणी करण्यात आली. त्यानंतर गाडी पुढे सोडण्यात आली मात्र, त्यानंतर पुन्हा एकदा संबंधीत व्यक्तीने बॉम्ब असल्याचे सांगितल्याने पोलिसांची चांगलीच धावपळ उडाली. त्यामुळे ही गाडी पुन्हा चिपळूणमध्ये तपासण्यात आली. त्यानंतर पुन्हा पनवेल स्थानकात बॉम्ब शोधक व नाशक पथकासह श्वानांच्या मदतीने संबंधीत वस्तूचा शोध घेण्यात आला. मात्र, त्यात काहीही आढळून आले नाही. त्यामुळे ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोणीतही यासंर्भात थट्टा केल्याचे पोलिसांकडूनही सांगण्यात येत आहे.

रेल्वेत बॉम्ब ठेवल्याची माहिती देणाऱी व्यक्ती नक्की कोण ही आणि त्याने अशी माहिती का दिली हे अद्याप कळू शकले नाही. रेल्वे पोलिसांसह जीआरपी याचा तपास करीत आहेत.