दादर रेल्वे बॉम्बने उडवून देणार असल्याच्या एका निनावी दुरध्वनीने बुधवारी खळबळ उडवली. रेल्वे पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाने तब्बल सहा तास कसून तपासणी केल्यानंतर हा दूरध्वनी अफवा असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी पुणे रेल्वे पोलिसांनी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
हरिदास भालचंद्र भाकरे (वय ३५, रा. वर्धा) असे ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहराच्या नियंत्रण कक्षाला बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता ७८४०९०७८२२ या भ्रमणध्वनीवरून हरिदास नावाच्या एका व्यक्तिने दूरध्वनी केला. दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ३ आणि ४  दुपारी बॉम्बने उडवून देणार असल्याची धमकी  त्याने दिली. रेल्वे सुरक्षा बल आणि रेल्वे पोलिसांनी कोणताही धोका न पत्करता श्वान पथकाच्या मदतीने दादर स्थानकाची तपासणी करण्यास सुरुवात केली. रेल्वे सुरक्षा बलाचे १५ कर्मचारी आणि रेल्वे पोलिसांचे २८ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दोन श्वान पथकांच्या सहाय्याने स्थानक पिंजून काढले. ७० संशयितांची तसेच दीडशे जणांच्या सामानांची तपासणी केली. बॉम्ब शोधक व नाशक पथकाने पुणे रेल्वे स्थानकांची कसून तपासणी केली. मात्र काहीच संशयास्पद आढळले नसल्याचे मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाचे पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी सांगितले.
तब्बल सहा तास ही तपास मोहीम सुरू होती. पोलिसांचा ताफा आणि उदघोषकाद्वारे घोषणा केल्याने प्रवाशांमध्येही घबराट पसरली होती.