प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर दहशतवाद्याच्या टार्गेटवर असल्याची माहिती समोर आली होती. दुश्मन फतेह Jihad-Ul-Akbar-Target-Dadar SIddhi vinayak Boom असा मेसेज देऊन प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिर उडवून देण्याची धमकी समोर आल्याने खळबळ उडाली होती. मात्र ही धमकी नसून एकतर्फी प्रेमातून करण्यात आलेला खोडसाळपणा आहे असे पोलिसांनी सांगितले आहे. ठाण्यातील व्हिव्हियाना मॉलमधल्या वॉशरूममध्ये धमकीचा मेसेज आढळल्याने खळबळ उडाली होती.

या प्रकरणी ठाणे पोलिसांनी एका संशयित तरूणाला ताब्यात घेतले. हा तरूण विक्रोळीचा आहे. एकतर्फी प्रेमातून आपणच हा खोडसाळपणा केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला एका मुलीला त्रास द्यायचा होता म्हणून त्याने हा सगळा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे. या तरूणाने धमकीचा मेसेज लिहून त्याखाली मुलीचा मोबाईल नंबर लिहिला होता. एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

दरम्यान याआधी धुळ्यातील नवीन देवपूर येथील दत्त मंदिर परिसरात असलेले स्वामी नारायण मंदिर बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीने काही दिवसांपूर्वी खळबळ उडाली होती. मंदिराच्या टपाल पेटीत हिंदी भाषेतील दोन निनावी पत्रं आढळली होती. या पार्श्वभूमीवर मंदिराच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली होती. मंदिराच्या टपाल पेटीत धमकी देणारी दोन निनावी पत्रं सापडली होती अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी दिली होती. त्यानंतर सिद्धिविनायक मंदिर उडवण्याची धमकी समोर आली. मात्र या प्रकरणामागे एकतर्फी प्रेम असल्याची माहिती समोर आली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या युवकाची चौकशी सुरू आहे.