सोमवारपासून प्रारंभ; एकूण १२ फेऱ्या होणार

पश्चिम रेल्वेवर हवेशीर आणि आरामदायी बम्बार्डियर लोकल गाडय़ांना प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेने येत्या सोमवारपासून बम्बार्डियर लोकल सीएसएमटी ते कल्याण आणि बदलापूर मार्गावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत पहिली लोकल सेवेत दाखल होणार असून तिच्या बारा फेऱ्या होतील, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली. मध्य रेल्वे मार्गावर भारतीय तंत्रज्ञान वापरण्यात आलेल्या ‘मेधा’ लोकलही येणार होत्या. या लोकल पश्चिम रेल्वेवर वळत्या करण्यात येत असून त्याबदल्यात बम्बार्डियर लोकल मध्य रेल्वेला मिळणार आहेत आणि यातीलच एक लोकल सेवेत येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प-२ अंतर्गत पश्चिम रेल्वेवर दोन वर्षांत प्रशस्त आणि हवेशीर अशा ७२ बम्बार्डियर कंपनीच्या लोकल गाडय़ा दाखल झाल्या. सुरुवातीला यातील ४० लोकल गाडय़ा मध्य आणि ३२ लोकल पश्चिम रेल्वेवर येणार होत्या. परंतु मध्य रेल्वेवर डीसी ते एसी परिवर्तन आणि इतर काही तांत्रिक कारणांमुळे मध्य रेल्वेने सुरुवातीला बम्बार्डियर लोकल गाडय़ा चालविण्यास नकार दिला होता. बम्बार्डियर लोकल पश्चिम रेल्वेला देतानाच त्या बदल्यात पश्चिम रेल्वेवरील सेवेत असलेल्या सीमेन्स लोकल गाडय़ा मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्या. मात्र बम्बार्डियर लोकल गाडय़ांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर मध्य रेल्वेनेही या प्रकारातील लोकल गाडय़ा दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यानुसार मध्य रेल्वेवर एकूण ११ बम्बार्डियर आणि भारतीय तंत्रज्ञान असलेल्या १३ मेधा लोकल गाडय़ा चेन्नईतील रेल्वेच्या कारखान्यातून ताफ्यात येणार होत्या. परंतु पश्चिम रेल्वेवर सध्या दोन मेधा लोकलही सेवेत असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मध्य रेल्वेकडे येणाऱ्या १३ मेधा लोकल पश्चिम रेल्वेने आपल्याकडे वळत्या करण्याची मागणी केली आणि त्याबदल्यात आपल्या ताफ्यातील बम्बार्डियर लोकल देऊ केल्या. ही मागणी मान्य करण्यात आली आणि पश्चिम रेल्वेकडून नुकतीच दाखल झालेली एक बम्बार्डियर लोकल येत्या सोमवारपासून प्रवाशांच्या सेवेत आणण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी ते कल्याण मार्गावर सेवा सुरू करतानाच बदलापूरसाठीही फेरीचा त्यात समावेश आहे. एकूण बारा लोकल फे ऱ्या होतील, असे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक सुरेंद्रकुमार जैन यांनी सांगितले.

वैशिष्टय़ काय?

  • सध्या धावणाऱ्या सीमेन्स लोकल गाडय़ांचा वेग ताशी ११० किमी असतो.
  • बम्बार्डियर लोकल गाडय़ांचा वेग ताशी १२० पर्यंत आहेत. त्यामुळे अधिक वेगाने त्या धावू शकतात.
  • बम्बार्डियर लोकल गाडीतील व्हेंटिलेशन हे यापूर्वीच्या गाडय़ांपेक्षा अधिक चांगले आहे.
  • या गाडीतील आसन व्यवस्थाही उत्तम आहे.

पहिली लोकल सोमवारपासून सेवेत

  • येणारी बम्बार्डियर लोकलची पहिली फेरी विद्याविहार ते कल्याण अशी असेल. सकाळी ६.५७ वाजता सीएसएमटी येऊन सुटून कल्याण येथे सकाळी ७.५५ वाजता पोहोचेल.