News Flash

गॅलऱ्यांचा फेरा : कलाकृतींमध्ये ‘समृद्ध अडगळ’

प्रदर्शन संपल्यावर ते पुन्हा गीव्ह यांच्या स्टुडिओत जाईल.

गीव्ह पटेल यांचे अपूर्ण चित्र (वर) आणि कौशिक यांची कलाकृती (शेजारी)

‘काळा घोडा कला महोत्सव’, ‘राज्य कला प्रदर्शन’ मग ‘बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १२५व्या वर्षांतलं प्रदर्शन’ असे एकापेक्षा एक उपक्रम पुढल्या आठवडय़ापासून मुंबईत होत असल्यानं मुंबईबाहेर राहणाऱ्यांनीही तारखांकडे लक्ष ठेवावंच. पण त्याआधी चालू आठवडय़ात सुरू असणाऱ्या कला-प्रदर्शनांमध्येही भरपूर पाहण्यासारखं आहे. यापैकी काही प्रदर्शनं पाहताना जरा विचार केलात, थोडी माहिती घेतलीत, डोळे उघडे ठेवलेत, योग्य प्रश्न विचारलेत तर तुम्हाला ‘कलेचा उच्च कोटीचा अनुभव’ म्हणतात, तसा अनुभव देऊ शकणारी ही प्रदर्शनं आहेत. चित्रं पाहण्यासाठी, त्यांचे संदर्भ समजावून घेण्यासाठी वेळ द्यावा लागतो. यावर जुने लोक म्हणतात- ‘‘शाब्दिक संदर्भ कशाला समजून घ्यायचे? चित्रानंच बोलावं की!’’  हे म्हणणं काही प्रमाणात बरोबर आहे, पण केव्हा? जर चित्रकाराची (किंवा दृश्यकलावंताची) दृश्य-भाषा जशी कलाशाळेत शिकवतात तशीच किंवा त्यापेक्षा थोडीफारच निराळी असेल तेव्हा! आजचा कलावंत स्वत:ची दृश्यभाषा जर शोधू पाहतो आहे, तर त्या शोधाच्या कुठल्या तरी टप्प्यावर त्याला (/तिला) अवघी काही मिनिटं पाहून – म्हणजे ती दृश्यभाषा ‘ओझरती ऐकून’ आपण म्हणणार- ‘‘काही कळत नाही बुवा हे असं कशाला केलंय ते!’’ असं आपलं होऊ नये, कुणाच्या तरी भाषेशी आपण इतकं मुजोरपणे वागू नये, यासाठी आपण आपल्या – शब्दांच्या – भाषेतून त्या-त्या कलावंतांनी घडवलेल्या दृश्यभाषेबद्दल जाणून घ्यायला काय हरकत आहे?

कौशिक मुखोपाध्याय (चटर्जी अ‍ॅण्ड लाल गॅलरी) आणि गीव्ह पटेल (गॅलरी मीरचंदानी+स्टाइनऱ्यूक) यांची प्रदर्शनं पाहायची, ती या दृश्यभाषेच्या अनुभवासाठी! यापैकी कौशिक यांच्या प्रदर्शनाला गेल्यावर पहिल्यांदा तर, आपण भंगाराच्या दुकानात आलो की काय असं वाटून जाईल. या जुन्या, ‘अपयशी’ किंवा ‘निकामी’पणाचा शिक्का बसलेल्या वस्तूंच्या अडगळीला सहजपणे पुन्हा जणू काही शिल्पांद्वारे ‘जिवंत’ करणं, ही कौशिक मुखोपाध्याय यांची दृश्यभाषा आहे. या वस्तू- किंवा त्यांचे निखळलेले सुटे सुटे भाग- इथं भल्यामोठय़ा आडव्या टेबलावर एकमेकांना जोडल्यामुळे त्यातून निर्माण झालेल्या कलाकृती आपणहून हलताहेत, काही वेळा त्यांची हालचाल संगणक-नियंत्रित आहे आणि संगणकीय आज्ञावलीच्या इशाऱ्याबरहुकूम एकेका वेळी एकेका भागातून आवाज येताहेत.. आपण बघत असू वा नसू; पण त्यांचं आपल्याआपल्यात जगणं चालू आहे. रूढार्थानं अपयशी ठरणाऱ्यांचं, असं एक पर्यायी जग कौशिक इथं उभारत आहेत. हा झाला या प्रदर्शनाचा एक भाग. दुसऱ्या भागात कौशिक यांनी मोठय़ा शिल्पांसारख्या कलाकृती केल्या आहेत. त्यापैकी बहुतेक कलाकृती काचेच्या कपाटांमध्ये, संग्रहालयात ठेवल्यासारख्या आहेत. ही कपाटं एका बाजूनं मोकळीच असल्यामुळे या शिल्पांतदेखील हवेच्या झोतागणिक हालचाल घडू शकते, पण कमी. या शिल्पांसाठीसुद्धा फेकून दिलेल्या, अडगळीतल्या वस्तूच वापरल्या आहेत. ‘असेम्ब्लाज’ असं या कलाकृतींना म्हणण्याची रीत अगदी १९१४ वगैरे सालापासून आहे. शंभर वर्षांपूर्वीच्या त्या ‘असेम्ब्लाज’चा हेतू अगदी आधुनिकतावादीच- ‘हा नवा आकार, नव्या पद्धतीनं मी घडवू शकलो’ एवढंच सांगण्याचा असे. इथं कौशिकच्या कलाकृतींत मात्र, हेतू बदललेले दिसतात. इतकंच काय, कौशिक मुखोपाध्याय यांचं २२ वर्षांपूर्वीचं काम ज्यांनी पाहिलं होतं त्यांना तर याच कलावंताचा त्या वेळचा हेतू आणि आताचा हेतू यातही फरक दिसू शकेल. अडगळ-वस्तूंमधून आजच्या जगण्यावर भाष्य करणं, जणू आजच्या आयुष्यांचं कळकटलेपण साजरं (ब्यूटिफाय नव्हे, सेलिब्रेट याच अर्थानं साजरं) करणारी खेळणी बनवणं, हे कौशिकला तेव्हा हवं होतं. आज मात्र तो अधिक भावनिक आणि अधिक चिंतनशीलही झाला आहे. तेव्हा तो तरुण होता, आज पन्नाशीकडे झुकला आहे, हेही कारण असेल. पण ताज्या प्रदर्शनातून अलीकडेच प्रेक्षकांना फेरफटका मारून आणताना कौशिक  एका शिल्पाजवळ थांबून ‘हे शिल्प मी आईची स्मृती म्हणून घडवलं’ असं म्हणाला, तेव्हा त्याला या अडगळीतली समृद्धी खरोखरच जाणवू लागली आहे, हेच मूर्तिमंत रूपात समोर दिसू लागलं. होय बरोबर, त्या शिल्पातून आईची स्मृती फक्त एकटा कौशिकच जागवतोय आणि बाकीच्यांना तसं प्रथमदर्शनी वाटणं अशक्यच आहे. तरीही तो हे सांगतो, तेव्हा शब्द बाकीच्यांसाठी असतात. कौशिकची खरी भाषा अडगळ आणि तिचा वापर, हीच असते. कुलाब्यात रेडिओ क्लबनजीक कमल मॅन्शन इमारतीच्या अखेरच्या जिन्यानं पहिल्या मजल्यावर असलेल्या ‘चटर्जी अ‍ॅण्ड लाल’ कलादालनात कौशिकच्या कलाकृती आहेत. तिथून जवळच जुन्या ताजमहल हॉटेलच्या मागे, मेरी वेदर रोडवरील ‘सनी हाऊस’च्या पहिल्या मजल्यावर ‘गॅलरी मीरचंदानी + स्टाईनऱ्यूक’ या कलादालनात गीव्ह पटेल यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे.

गीव्ह पटेल यांनी वृद्धांची काही चित्रं केली आहेत. त्यांतले चेहरे सलग नाहीत. वृद्धत्वात त्वचेत भिनणारा सैलावलेपणा, जगण्यातच आलेला विसविशीतपणा यांची ही चित्रं आहेत, हे त्यातल्या रंगरेषांतूनच कळतं. हे चेहरे प्रथमदर्शनीच जरा भेसूरही वाटतील. नीट पाहिल्यास ओळखीच्या किंवा तोंडओळख असलेल्या अनेक ज्येष्ठ नागरिकांची आठवणही येऊ शकेल. नाही आली, तरीही सैल त्वचा आणि सुरकुत्या यांच्यातली ‘समृद्धी’ गीव्ह यांनी जाणली आहे, हे तरी रंग सांगतीलच. याच प्रदर्शनातलं एक चित्र अपूर्ण आहे. रंगांचे एकदोनच थर त्यावर आहेत. तरीही हे चित्र, प्रदर्शनात लावण्याचा निर्णय गीव्ह यांनी घेतला. प्रदर्शन संपल्यावर ते पुन्हा गीव्ह यांच्या स्टुडिओत जाईल. कदाचित आणखी काही दिवस अडगळीसारखंच पडून राहील.

निवांत निसर्ग!

मिलिंद ढेरे यांनी प्रामुख्यानं महाराष्ट्रात आणि लडाखमध्ये टिपलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन ‘जहांगीर’च्याच फोटोग्राफी दालनात भरलं आहे. जहांगीर आर्ट गॅलरीच्या गोल पॅसेजमधून उजवीकडल्या जिन्यानं गच्चीत गेल्यावर हे दालन आहे. मिलिंद यांनी, वडील रा. चिं. ढेरे यांच्या संशोधन प्रकल्पांसाठी फोटोनोंदी केल्याचं अनेकांना माहीत असेल. त्यापेक्षा हे काम अगदी वेगळं आहे. इथं मेंढपाळांच्या वाटांचा पुनशरेध मिलिंद ढेरे घेत आहेत. त्या वाटांमधलं निवांत सौंदर्य टिपत आहेत. तजेलदार आकाश, त्यातून भुईवर पडणारा लोभस प्रकाश आणि वाटा-पायवाटा, डोंगर-कपारी, फुलं-पानं यांमधून निवांतपणाची- शांतीची लागलेली आस हा त्यांच्या छायाचित्रांचा गाभा असल्याचं जाणवेल. ‘पिक्टोरिअल फोटोग्राफी’ म्हणून जी छायाचित्रं ओळखली जातात, त्यापेक्षा ही छायाचित्रं फार वेगळी नसल्याचं काही जणांना वाटेलही, पण निसर्गाचा निवांतपणा कुठेही पाहात राहण्यासारखाच असतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 2, 2017 2:18 am

Web Title: bombay art society exhibition
Next Stories
1 शेख हत्येप्रकरणातील पुरावे सादर करण्याचे आदेश
2 मालमत्ता कराच्या थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई 
3 आर्थिक पाहणी अहवाल अर्धवट!
Just Now!
X