मुंबई महापालिकेने नवे धोरण जाहीर करीत पदपथांचा वापर वाहनतळांसाठी करणाऱ्यांना धक्का दिला असून त्याचा फटका बॉम्बे जिमखान्यालाही बसण्याची चिन्हे आहेत. नव्या धोरणामुळे बॉम्बे जिमखान्यालगतच्या पदपथावरील वाहनतळाचे नूतनीकरण होणे अवघड बनले असून आपल्या सभासदांची वाहने उभी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची वेळ जिमखान्यावर ओढवणार आहे.

आपल्या धनदांडग्या सभासदांची वाहने उभी करता यावीत यासाठी बॉम्बे जिमखान्याकडून महात्मा गांधी रोडवरील जिमखान्यालगतच्या पदपथाचा वाहनतळासाठी वापर करण्यात येत होता. पालिकेने या वाहनतळाला दिलेल्या परवानगीची मुदत संपुष्टात आली असून अद्याप परवानगीचे नूतनीकरण करण्यात आलेले नाही. ‘स्वच्छ भारत अभियाना’अंतर्गत छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसर सुशोभित करण्यासाठी तेथील अधिकृत स्टॉल्स महात्मा गांधी रोडवर हलविण्यात येणार आहेत. मात्र बॉम्बे जिमखान्यालगतच्या वाहनतळाचा प्रश्न न सुटल्यामुळे स्टॉल्सचे स्थलांतर रखडले आहे.

पर्यायी व्यवस्था करावी लागणार

बॉम्बे जिमखान्यामध्ये विविध क्षेत्रांतील बडी मंडळी सभासद असून ही मंडळी नियमितपणे जिमखान्यात येत असतात. सध्या वाहनतळाच्या परवानगीचे नूतनीकरण झालेले नसतानाही या पदपथावर सभासदांची वाहने उभी करण्यात येत आहेत. मात्र आता परवान्याचे नूतनीकरण होण्याची शक्यता धूसर बनल्यामुळे बॉम्बे जिमखान्याला सभासदांची वाहने उभी करण्यासाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.