प्रसाद रावकर

रस्ता रुंदीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचा निर्णय

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोरून थेट फॅशन स्ट्रीटच्या दिशेने जाणाऱ्या हजारीमल सोमाणी मार्गाच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या आझाद मैदानातील बॉम्बे जिमखान्याच्या अखत्यारीत असलेला भाग मिळत नसल्याने रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. बॉम्बे जिमखान्याचा भाडेपट्टा संपुष्टात आल्यामुळे आता रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेला आझाद मैदानातील जागा ताब्यात घेण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाने घेतला असून या संदर्भात ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकासमोरील हजारीमल सोमाणी मार्गाच्या रुंदीकरणाची गरज लक्षात घेऊन मुंबईच्या विकास आराखडय़ात रस्ता रेषा निश्चित करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि चर्चगेट परिसराला जोडणारा हा रस्ता असून या रस्त्यावरून दररोज हजारो नागरिक आणि वाहने ये-जा करीत असतात. सध्या हा रस्ता अरुंद असल्याने तेथे प्रचंड वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम भेडसावत असतो. ही बाब लक्षात घेऊन पालिकेने या रस्त्याचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. दोन टप्प्यांत या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार होते. पहिल्या टप्प्यातील काम छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेहून निम्म्या रस्त्यापर्यंत करण्यात येणार होते. तर पुढच्या टप्प्यात फॅशन स्ट्रीटच्या दिशेच्या पुढील रस्त्याच्या विस्तारीकरणाचा बेत होता. यासाठी तयार करण्यात आलेल्या आराखडय़ानुसार बॉम्बे जिमखान्याचा काही भाग रस्ता रुंदीकरणामध्ये येत होता. त्यामुळे वाद निर्माण झाला आणि रस्ता रुंदीकरणाचे घोंगडे भिजत पडले. दरम्यान, तब्बल एक वर्ष लोटले तरी पहिल्या टप्प्यातील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेली जागा पालिकेला हस्तांतरित झाली नाही. त्यामुळे या कामासाठी देण्यात आलेले कंत्राट रद्द करण्याची वेळ पालिकेवर ओढवली. बॉम्बे जिमखान्याला भाडेपट्टय़ाने आझाद मैदानातील जागा देण्यात आली असून त्याचा भाडेकरार संपुष्टात आला आहे. त्यामुळे बॉम्बे जिमखान्याने भाडेपट्टय़ाचे नूतनीकरण करावे यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे अर्ज केला आहे. या अर्जावर अद्याप निर्णय झालेला नाही.  ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ामध्ये या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सुनावणीचे आयोजन करण्यात आले असून या सुनावणीदरम्यान रस्त्यासाठी लागणारी जागा ताब्यात घेण्याबाबत निर्णय होईल, असे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

विकास आराखडय़ात हजारीमल सोमाणी मार्गाच्या रुंदीकरणाची तरतूद करण्यात आली आहे. रस्त्याच्या रुंदीकरणात आझाद मैदानाचा काही भाग येणार आहे. आझाद मैदानाचा काही भाग बॉम्बे जिमखान्याला भाडेपट्टय़ाने देण्यात आला आहे. मात्र बॉम्बे जिमखान्याबरोबर करण्यात आलेल्या भाडेकराराची मुदत संपुष्टात आली असून रस्त्यासाठी आवश्यक असलेला आझाद मैदानातील भाग सरकारजमा करण्यात येईल. त्यासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवडय़ात सुनावणी होणार आहे.

– शिवाजी जोंधळे, जिल्हाधिकारी, मुंबई शहर