करार संपल्यानंतरही वाहने उभी करणे कायम

हजारीमल सोमाणी मार्गाच्या विस्तारीकरणाच्या निमित्ताने प्रकाशझोतात आलेल्या बॉम्बे जिमखान्याचा पालिकेबरोबर झालेला करार संपुष्टात आला असतानाही एम. जी. रोडवरील पदपथाचा वाहनतळ म्हणून वापर सुरूच आहे. मुंबईत परवानगी नसलेल्या ठिकाणी वाहन उभे केल्यानंतर त्यावर कारवाई करण्याची तत्परता वाहतूक पोलिसांकडून नेहमीच दाखविली जाते. मात्र एम. जी. रोडवरील बॉम्बे जिमखान्याबाहेरील पदपथावर गेल्या १६ जुलैपासून बेकायदेशीरपणे वाहने उभी केली जात आहेत. समोरच वाहतूक पोलिसांची चौकी असूनही पदपथावरील या वाहनांवर अद्यापही कारवाई करण्यात आलेली नाही. करार संपल्यानंतर कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत वाहनतळाचा विनाशुल्क वापर करण्यास वाहनधारकांना मुभा दिली जाते. तशी मुभा क्लबचे सभासद नसलेल्या व्यक्तींना त्यांची वाहने उभी करण्यास मिळणार का, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

ब्रिटिश काळात सुरू करण्यात आलेल्या बॉम्बे जिमखान्यामध्ये उद्योगपती, बडे अधिकारी आदींचा राबता आहे. क्लबमध्ये येणाऱ्या धनदांडग्या सभासदांची वाहने उभी करण्यासाठी बॉम्बे जिमखान्याने पालिकेकडून परवानगी घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून पदपथाचाच वाहनतळ बनविला आहे. या पदपथावरील वाहनतळामध्ये क्लबच्या सभासदांशिवाय कुणालाच गाडी उभी करू दिली जात नाही. त्यासाठी क्लबने सुरक्षारक्षक तैनात केला आहे. क्लबचा सभासद नसलेली एखादी व्यक्ती आपले वाहन तेथे उभे करण्यास आलीच तर हे सुरक्षारक्षक अतिशय उर्मट भाषेत त्यांची बोळवण करीत असतात. वाहनतळासाठी केलेल्या कराराचे बॉम्बे जिमखान्याला नूतनीकरण करावे लागते. बॉम्बे जिमखान्याने वाहनतळाबाबत केलेल्या कराराची मुदत १५ जुलै २०१६ रोजी संपुष्टात आली आहे. कराराचे नूतनीकरण करावे यासाठी बॉम्बे जिमखान्याने पालिकेला विनंती केली आहे. मात्र असे असले तरीही बॉम्बे जिमखान्याबाहेरील पदपथाचा वापर आजही वाहनतळ म्हणूनच केला जात आहे.

पालिकेने मुंबईमधील सार्वजनिक ठिकाणी, तसेच काही रस्त्यांवर वाहनतळांच्या जागा निश्चित केल्या आहेत. ही वाहनतळे कंत्राटदारांना चालविण्यासाठी देण्यात आली आहेत. पालिकेने कंत्राटदारांबरोबर केलेला करार संपुष्टात आल्यावर पुढील कंत्राटदाराची नियुक्ती होईपर्यंत वाहनमालकांना वाहनतळावर विनाशुल्क गाडय़ा उभ्या करता येतात. ही वाहनतळे वगळता अन्य ठिकाणी, तसेच पदपथांवर उभ्या करण्यात येणाऱ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांमार्फत कारवाई केली जाते. बॉम्बे जिमखान्याबाहेरच्या पदपथावरील वाहनतळाचा करार संपुष्टात आल्यामुळे बिगरसभासदांची वाहने विनाशुल्क उभी करण्यास परवानगी मिळणार का किंवा वाहतूक पोलीस या पदपथावरील वाहनांवर कारवाई करणार का, असे प्रश्न आहेत.