मुंबई : विमातळावरील कडेकोट सुरक्षेचे कवच भेदून माथेफिरू थेट धावपट्टीवरील विमानाजवळ पोहोचल्याच्या घटनेची उच्च न्यायालयाने बुधवारी गंभीर दखल घेतली. तसेच या सगळ्या प्रकाराबाबत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडून न्यायालयाने खुलासा मागितला आहे.

विमानतळाच्या सुरक्षेबाबत अ‍ॅड्. यशवंत शेणॉय यांनी केलेल्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळी त्यांनी या घटनेबाबत न्यायालयाला माहिती दिली. तसेच विमानतळावरील सुरक्षेतील त्रुटींकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठानेही या प्रकाराची गंभीर दखल घेत विमानतळ खरेच सुरक्षित आहे का? असा सवाल केला. तसेच विमानतळावरील सुरक्षाकवच भेदून एखादा माथेफिरू धावपट्टीवरील विमानाजवळ पोहोचलाच कसा? याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्याच महिन्यात या माथेफिरूने विमानतळाची संरक्षक भिंत ओलांडून धावपट्टीवर घुसखोरी केली होती. तो थेट उड्डाणासाठी सज्ज असलेल्या स्पाइसजेट विमानाजवळ पोहोचला होता. तो तेथे पोहोचेपर्यंत तेथे कुणीच नव्हते. तो तेथे पोहोचल्यानंतर सुरक्षारक्षकांनी तेथे धाव घेत त्याला ताब्यात घेतले होते. त्यानंतर चौकशीदरम्यान तो मानसिक रुग्ण असल्याचे उघड झाले होते.