कंगना रणौतचं मुंबईतील ऑफिस तोडल्याचं प्रकरण मुंबई हायकोर्टात गेलं आहे. या प्रकरणी कंंगनाने दाखल केलेल्या याचिकेनंतर शिवसेना खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत तसंच महापालिकेचे अधिकारी भाग्यवंत लोटे या दोघांनाही प्रतिवादी करण्यात आलं आहे. या प्रकरणावर आज सुनावणी सुरु असतान या दोघांनीही उत्तर देण्यासाठी मुदतवाढ मागितली. ज्यानंतर कोर्टानं या दोघांना मुदतवाढ दिली आहे. मात्र तो बंगला तोडलेल्या अवस्थेत सोडू शकत नाही असंही हायकोर्टाने म्हटलं आहे. इतकंच नाही तर तुम्हाला उत्तर देण्यासाठी मुदतवाढ हवी आहे तर देतो आहे मात्र एरवी तुम्ही वेगानेच सगळ्या गोष्टी करता, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

आणखी वाचा- आम्ही कोणतीही लढाई लढण्यास तयार; कोर्टातली लढाई मला नवीन नाही – संजय राऊत

दरम्यान संजय राऊत यांना प्रतिवादी करण्यात आल्यानंतर त्यांना जेव्हा याबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले किती खटले घाला आम्ही घाबरत नाही. बाबरीपासून खटले अंगावर घेत आलोच आहोत. तसंच शहर आणि राज्याच्या अभिमानासाठी लढा देणारच असंही त्यांनी म्हटलं होतं.

आणखी वाचा- महाराष्ट्राला बदनाम करण्याचं सुनियोजित षडयंत्र रचलं जातंय : संजय राऊत

काय आहे प्रकरण?

कंगना रणौतने काही दिवसांपूर्वी मुंबई ही आपल्याला पाकव्याप्त काश्मीरसाखी वाटते अशी प्रतिक्रिया दिली होती. ज्यानंतर तिच्याविरोधात विविध संतप्त प्रतिक्रिया आल्या होत्या. सिनेसृष्टीतून आणि राजकीय वर्तुळातून या प्रतिक्रिया आल्या. शिवसेना खासदार संजय राऊत आणि कंगना रणौत यांच्यात तर ट्विटर वॉर रंगले होते. त्यानंतर ज्या कुणाची हिंमत असेल त्यांनी मला अडवून दाखवा मी ९ सप्टेंबरला मुंबईत येते आहे असं कंगनाने म्हटलं होतं. दरम्यान या सगळ्या वादानंतर कंगनाला केंद्र सरकारने वाय दर्जाची सुरक्षाही पुरवली होती. कंगना ९ सप्टेंबर रोजी जेव्हा मुंबईत आली तेव्हा तिच्या ऑफिसचा काही भाग अनधिकृत ठरवत तो तोडण्यात आला. या प्रकाराविरोधात कंगनाने न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.