सलमान खानला ‘हिट अँड रन’ प्रकरणामध्ये शुक्रवारी जामीन मंजूर झाल्याचे समजताच त्याच्या चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. त्याच्या घराखाली सकाळपासून गर्दी केलेल्या चाहत्यांनी तर जल्लोषच साजरा केला. सलमानच्या जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होणार म्हणून सलमानच्या चाहत्यांचे या निकालाकडे डोळे लागून राहीले होते. दुपारी निकाल समजताच परिसरात मोठय़ा प्रमाणावर घोषणाबाजी झाली आणि परिसर दुमदुमून गेला. इतकेच नव्हे तर काहींनी तर पेढे आणि मिठाईचे वाटप करून तोंड गोडही केले. ‘सलमानकडून एक चूक झाली मात्र त्यानंतर त्याने अनेक चांगली कामे केली आहेत. याचा विचार करून त्याची शिक्षा माफ करावी’, अशी मागणी त्याचे चाहते करत होते. यानंतर संध्याकाळी सलमान जेव्हा जामिनाची कार्यवाही संपवून घरी परताला त्यावेळेस चाहत्यांनी त्याच्या गाडीभोवतीच गराडा घातला. अखेर सलमान व त्याच्या कुटुंबियांनी गॅलरीत येऊन चाहत्यांना अभिवादन केले. यानंतर चाहत्यांनी गर्दी हळूहळू पांगू लागली.