बोगस तक्रारी दाखल होत असल्या तरीही..

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला किंवा प्रेमभंग झाल्यानंतर सूड उगवण्यासाठी प्रियकराविरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याचा आरोप करण्यात येत असला, तरी अशा प्रकरणांमध्ये बलात्कारासारखा दखलपात्र गुन्हा दाखल करू नका, असे आदेश पोलिसांना दिले जाऊ शकत नाहीत. किंबहुना असा गंभीर गुन्हा दाखल करण्यास पोलीस बांधील असल्याचे राज्य सरकारतर्फे मंगळवारी उच्च न्यायालयाला सांगण्यात आले. परंतु अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मार्गदर्शिका आखण्याची गरज न्यायालयाला वाटत असेल तर तसे आदेश पोलिसांना दिले जातील हेही सरकारकडून स्पष्ट करण्यात आले.

अशा प्रकरणांमध्ये बलात्काराची तक्रार ही प्रामुख्याने सूड उगवण्याच्या उद्देशाने केली जाते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालणारी मार्गदर्शिका आखण्याचे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका फिरोझ खान याने अ‍ॅड्. महेश वासवानी यांच्यामार्फत केली आहे. न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी राज्य सरकारने प्रतिज्ञापत्र केले. त्यात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केला किंवा प्रेमभंग झाल्यानंतर सूड उगवण्यासाठी प्रियकराविरोधात खोटा गुन्हा दाखल करण्याचे प्रमाण वाढल्याचा आरोप करण्यात येत असला, तरी अशा प्रकरणांमध्ये बलात्कारासारखा दखलपात्र गुन्हा दाखल करू नका, असे आदेश पोलिसांना दिले जाऊ शकत नाहीत. किंबहुना असा गंभीर गुन्हा दाखल करण्यास पोलीस बांधील असल्याचा दावा सरकारने केला आहे.

* बलात्काराबाबतच्या कायद्यात झालेल्या दुरुस्तीत, लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक संबंध ठेवण्यात आले असले तरी हे लैंगिक संबंध मुली वा महिलेच्या संमतीने झाले असतील तर त्याला बलात्कार मानता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आलेले आहे. शिवाय बलात्काराचा आरोप करण्यात आला आणि तक्रार वा गुन्हा दाखल केला, तरी लैंगिक संबंध परस्पर संमतीने होते वा लग्नाचे आमिष दाखवून ते प्रस्थापित केले गेले होते, याबाबत चौकशी करण्याची मुभा पोलिसांना आहे. एवढेच नव्हे, तर आरोपात तथ्य नाही हे असे तपासादरम्यान उघड झाले, तर त्याची माहिती संबंधित तपास अधिकाऱ्याने न्यायालयाला देणे अनिवार्य आहे. तक्रारदाराचा हक्क आणि एखाद्या निर्दोष व्यक्तीला उगाचच गोवले जाऊ नये याची काळजी नव्या कायद्यात घेण्यात आलेली आहे