पुन्हा वेश्या व्यवसायात ढकलले जाण्याची न्यायालयाची भीती

मुंबई : अल्पवयीन मुलीला पुन्हा वेश्या व्यवसायात ढकलले जाऊ शकते, अशी भीती व्यक्त करत या मुलीला आईवडिलांच्या हवाली करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

उत्तर प्रदेश येथील रहिवाशी असलेल्या अल्पवयीन मुलीची पोलिसांनी दोन वर्षांपूर्वी वेश्या व्यवसायातून सुटका केली. सध्या ही मुलगी मानखुर्द येथील बालगृहात आहे. तिच्या सुटकेबाबत माहिती मिळाल्यावर आईवडिलांनी मुंबईत धाव घेतली. तसेच तिचा ताबा मिळवण्यासाठी कनिष्ठ न्यायालयात याचिका केली होती. त्यात त्यांनी आपली मुलगी बहिणीला भेटण्यासाठी मुंबईत आली होती. मात्र पोलिसांनी तिला उगाचच ताब्यात घेतले, असा दावा त्यांनी केला होता. त्यानंतर या मुलीला आईवडिलांच्या ताब्यात देण्याबाबत न्यायालयाने बालकल्याण समितीकडून अहवाल मागितला होता.

या मुलीला आईवडिलांच्या ताब्यात देऊ नये, असा अहवाल बालकल्याण समितीने सादर केला होता. न्यायालयाने हा अहवाल स्वीकारत तसेच ही मुलगी १८ वर्षांची होईपर्यंत तिला बालगृहात ठेवण्याचे आदेश दिले.  तिने वयाची १८ वर्षे पूर्ण केल्यानंतर तिची इच्छा असल्यास ती आईवडिलांकडे जाऊ शकते, असेही स्पष्ट केले होते. या निर्णयाविरोधात आईवडिलांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्या. एस. एस. शिंदे यांनी सत्र न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत मुलीच्या आईवडिलांची याचिका फेटाळली. पोलिसांनी वेश्या व्यवसाय करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला होता, ही बाब लक्षात घेता सत्र न्यायालयाने दिलेला निर्णय योग्य आहे. त्यामुळे या मुलीला आईवडिलांच्या हवाली केले, तर ती पुन्हा वेश्या व्यवसायात ढकलले जाण्याची भीती न्यायालयाने व्यक्त केली.