13 December 2017

News Flash

पानसरे हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्यास हायकोर्टाचा नकार

हा तपास सीबीआयकडे सोपविला जाईल, अशी अटकळ बांधली जात होती.

एक्स्प्रेस वृत्तसेवा, मुंबई | Updated: June 23, 2016 3:02 PM

मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) हस्तांतरित करण्यास नकार दिला. महाराष्ट्र पोलिसांनीच या प्रकरणाचा तपास पुढे सुरू ठेवावा, असे न्यायालयाने यावेळी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात यावा अशी मागणी पानसरे कुटुंबीयांकडून करण्यात येत होती. त्यांच्या या मागणीला आज मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचे वृत्त होते. या पार्श्वभूमीवर हा तपास सीबीआयकडे सोपविला जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. मात्र, न्यायालयाने तसे करण्यास नकार दिला. याशिवाय, पानसरे कुटुंबियांनी तपासात अडथळा येईल अशी कोणतीही माहिती उघड करू नये, असे निर्देशही न्यायालयाकडून देण्यात आले आहेत. सीबीआयकडून काही दिवसांपूर्वी पानसरे यांच्यावर झाडण्यात आलेल्या गोळ्या बॅलेस्टिक तपासणीसाठी स्कॉटलंड यार्डकडे पाठविण्यात आल्या होत्या. त्याचा प्रगती अहवाल येत्या सहा आठवड्यात सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तसेच सीबीआयकडून सुरू असलेल्या तपासाच्या मंद गतीवरही न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.

First Published on June 23, 2016 3:00 pm

Web Title: bombay hc refuses to hand over govind pansare murder case to cbi