दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी न्यायालयाचा सवाल

मुंबई : पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्याला महाराष्ट्रात येऊन अटक करणे कर्नाटक पोलिसांना जमू शकते, ते डॉ. नरेंद्र दाभोलकर – कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआय आणि राज्य पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी)आतापर्यंत का शक्य झालेले नाही, असा सवाल करत दोन्ही तपास यंत्रणांच्या तपासाबाबत उच्च न्यायालयाने गुरुवारी तीव्र संताप व्यक्त केला. एवढेच नव्हे, तर दाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणांतील संशयित आणि ते ज्या ‘संस्थे’शी संबंधित आहेत त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवण्याचा दावा करण्याशिवाय दोन्ही यंत्रणांनी आतापर्यंत काहीच केले नसल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले. तसेच सीबीआयच्या सहसंचालकांसह राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना पुढील सुनावणीच्या वेळी हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

दोन्ही हत्या प्रकरणांच्या तपासाविषयी असमाधानी असलेल्या दाभोलकर आणि पानसरे यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. त्या वेळी लंकेश यांच्या मारेकऱ्याला कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रात येऊन अटक केल्याची बाब याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आली. तसेच लंकेश आणि  एम. एम. कलबुर्गी यांची हत्या एकाच पिस्तुलाने करण्यात आल्याचे न्यायवैद्यक अहवालातून स्पष्ट झाले आहे हेही न्यायालयाला सांगण्यात आले. सीबीआयच्या सहसंचालकांसह राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांना १२ जुलैच्या सुनावणीस हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे.