उच्च न्यायालयाचे ताशेरे

मुंबई : काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसलगतचा (सीएसएमटी) पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचा दाखला देत तंत्रज्ञांचा भरणा असताना आणि पुलांची संयुक्तपणे नियमित संरचनात्मक पाहणी केली जात असल्याचा दावा करूनसुद्धा पूल का कोसळतात? असा सवाल उच्च न्यायालयाने बुधवारी पालिका आणि रेल्वे प्रशासनाला केला. दोन्ही यंत्रणांतील समन्वयाच्या अभावामुळेच या दुर्घटना घडत असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले. पूल कोसळतात, लोक मरतात, परंतु त्यानंतरही यंत्रणा ढिम्म असल्याची उद्विग्नताही न्यायालयाने या वेळी व्यक्त केली.

प्रभादेवी स्थानकातील पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती नको, म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आदेश रेल्वे आणि पालिका प्रशासनांना द्यावेत, या मागणीसाठी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी पालिका आणि रेल्वे प्रशासनानेही भविष्यात या घटना रोखण्यासाठी सगळ्या पादचारी पुलांची नियमित संयुक्तपणे संरचनात्मक पाहणी करू, बैठका घेऊ, असे आश्वासन न्यायालयाला दिले होते.

मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या प्रकरणी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने सीएसएमटी स्थानकाबाहेरील पादचारी पूल कोसळल्याने सहाजणांच्या झालेल्या मृत्यूच्या घटनेचा दाखला देत पालिका आणि रेल्वे प्रशासनाला धारेवर धरले.