मुंबई: पुण्यातील गहुंजे येथे बीपीओ कर्मचाऱ्याची सामूहिक बलात्कार करून हत्या केल्या प्रकरणातील दोन दोषींच्या फाशीची अंमलबजावणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी पुढे ढकलली. पुढील निर्देशांपर्यंत हे आदेश कायम राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या दोघा दोषींना सोमवारी (२४ जून) फाशी देण्यात येणार होती.फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणीस झालेल्या विलंबामुळे एकीकडे आपल्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले आहे, तर दुसरीकडे जगण्याची उमेदही निर्माण झाली आहे, असा दावा करत पुरुषोत्तम बोराटे आणि प्रदीप कोकडे या दोषींनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच २४ जून रोजी त्यांना देण्यात येणारी फाशी रद्द करून जन्मठेप देण्याची विनंती केली आहे. सर्वोच्च न्यायालयानेही त्यांच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर दोघांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता.