कल्याणमधील १३ वर्षांच्या मुलीच्या गर्भपातास मुंबई हायकोर्टाने सोमवारी परवानगी दिली. पीडित मुलगी ही २४ आठवड्यांची गर्भवती असून मंगळवारी जेजे रुग्णालयात तिच गर्भपात केला जाणार आहे.

कल्याणमधील १३ वर्षांच्या मुलीचे जुलै २०१७ मध्ये एका कामगाराने अपहरण केले होते. आरोपी कामगार हा २३ वर्षांचा आहे. बचपन बचाव आंदोलन या एनजीओने उत्तर प्रदेशमधील एका गावातून १५ मार्च रोजी मुलीची सुटका केली होती. पीडित मुलगी ही २४ आठवड्यांची गर्भवती होती.

शनिवारी मुंबई हायकोर्टात पीडित मुलीच्या वतीने दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी झाली. मुलीला गर्भपाताची परवानगी द्यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती. हायकोर्टाने या प्रकरणात जेजे रुग्णालयातील डॉक्टरांची एक समिती नेमली होती. या समितीने हायकोर्टात सोमवारी अहवाल सादर केला. या समितीने गर्भपाताची सुचना केली होती. प्रसूतीदरम्यान मुलीच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो, त्यामुळे गर्भपात करावा, असे समितीच्या अहवालात म्हटले होते. सोमवारी या अहवालाच्या आधारे हायकोर्टाने गर्भपातास परवानगी दिली. मंगळवारी पीडित मुलीचा जेजे रुग्णालयात गर्भपात करावा, असे हायकोर्टाने सांगितले.