गेल्या तीन आठवडय़ांपासून गर्भपाताच्या प्रतीक्षेत असलेल्या कांदिवलीतील १३ वर्षांच्या मुलीच्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. ती ३१ आठवडय़ांची गर्भवती असून सर्वोच्च न्यायालय सोमवारी तिला गर्भपाताला परवानगी देणार की नाही याबाबत निर्णय होणार आहे. या निर्णयावर तिचे भवितव्य अवलंबून आहे.

काही दिवसांपूर्वी या १३ वर्षीय गर्भवती मुलीच्या आई-वडिलांनी सर्वोच्च न्यायालयात गर्भपातासाठी याचिका दाखल केली होती. गर्भपाताच्या कायद्यानुसार २० आठवडय़ांनंतर गर्भपात करण्यास परवानगी नसल्याने या गर्भवतीच्या पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने जे. जे. रुग्णालयाला या गर्भवती मुलीची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. मात्र गेल्या आठवडय़ात मुंबईत झालेल्या अतिवृष्टीमुळे या गर्भवतीला रुग्णालयात येणे शक्य झाले नाही. त्यामुळे शुक्रवारी तिची तपासणी करण्यात आली आणि त्याबाबतचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे पाठविण्यात आला. सर्वोच्च न्यायालयात सोमवारी या प्रकरणावर सुनावणी होणार आहे.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. निखिल दातार गर्भपाताच्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी पाठपुरावा करीत आहेत. अनेकदा गर्भातील व्यंग २० आठवडय़ांनंतर स्पष्ट होतो. या कारणामुळे अनेक गर्भवती महिलांनी २० आठवडय़ांनंतर गर्भपाताची मागणी केली आहे. मात्र कायद्यात २० आठवडय़ांनंतर गर्भपातास परवानगी नसल्याने महिलांना सर्वोच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते. कांदिवलीतील या १३ वर्षांच्या मुलीच्या भविष्याचा व आरोग्याचा विचार करता वेळीच तिचा गर्भपात करणे आवश्यक आहे, असे क्लाऊड नाईन रुग्णालयाचे प्रमुख डॉ. निखिल दातार यांनी सांगितले.