बेकायदा बांधकामांना संरक्षण देणारे धोरण सरकार लवकरच आणणार आहे या आशेवर कारवाई टाळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेणाऱ्या दिघावासीयांना उच्च न्यायालयाने बुधवारी तडाखा दिला. सरकार धोरण आणणार या आशेवर अवलंबून किती वेळ कारवाई टाळण्याची मागणी करणार, हे किती दिवस सहन करायचे, हे कुठे तरी थांबले पाहिजे, अशा शब्दांत न्यायालयाने फटकारले. तसेच सरकारी धोरणाचा फायदा घेणार नाही असे हमीपत्र दिले तरच घरे रिकामी करण्यास मुदतवाढ दिली जाईल, असे बजावत त्याबाबतची भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
दिघा येथील बेकायदा बांधकामांवरील कारवाई थांबवण्यासाठी राज्य सरकारने बेकायदा बांधकामांना संरक्षण देणाऱ्या धोरणाचा आराखडा मंजुरीसाठी दोनवेळा न्यायालयात सादर केला. मात्र विकास नियमावली आणि पालिका कायद्याला बगल देऊन तसेच कुठलाही सारासार विचार न करता हे धोरण आखण्यात आल्याचा ठपका ठेवत दोन्ही वेळेस न्यायालयाने सरकारचे हे धोरण बासनात गुंडाळले. सरकारने धोरण सादर करेपर्यंत न्यायालयाने दिघ्यातील बेकायदा बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिली होती. मात्र दुसरे धोरण रद्द करताना या बेकायदा बांधकामे रिकामी करण्यास न्यायालयाने मे अखेरीपर्यंतची मुदत दिली होती. परीक्षाकाळ लक्षात घेऊन ही मुदतवाढ देण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.
असे असतानाही काही रहिवाशांनी पुन्हा एकदा न्यायालयात धाव घेतली आहे. न्या. अभय ओक आणि न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी झाली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on June 9, 2016 12:40 am