उत्तरपत्रिकांच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनाचा गोंधळ; उच्च न्यायालयाने विद्यापीठाला सुनावले; दाव्यावरही नाराजी

उत्तरपत्रिकांच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनामुळे निकाल जाहीर करण्यात झालेल्या गोंधळाप्रकरणी विविध अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिका या प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी केलेले नाटक (पब्लिसिटी स्टंट) आहे, असा अजब दावा मुंबई विद्यापीठाने शुक्रवारी केला. मात्र विद्यार्थ्यांच्या याचिका या जर प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीचे नाटक आहे, तर याच गोंधळावरून कुलगुरूंना ‘घरचा रस्ता’ दाखवणे हेही विद्यापीठाने प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी केलेले नाटकच होते का, असा उलट सवाल करीत उच्च न्यायालयाने विद्यापीठाच्या दाव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. एवढेच नव्हे, तर स्वत:चे अपयश लपवण्यासाठी विद्यार्थ्यांवर त्याचे खापर फोडण्याच्या विद्यापीठाच्या भूमिकेवरही न्यायालयाने ताशेरे ओढले.

या गोंधळाची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी काय धोरणात्मक निर्णय घेणार, सध्याच्याच कंपनीचे कंत्राट कायम ठेवणार का, असा सवाल करीत त्यावर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले होते.

विविध विद्यार्थ्यांनी अ‍ॅड्. मिहिर देसाई, अ‍ॅड्. अपर्णा देवकर यांच्यामार्फत केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती भूषण गवई आणि न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या खंडपीठासमोर शुक्रवारी एकत्रित सुनावणी झाली. त्या वेळी उत्तरपत्रिकांच्या ऑनस्क्रीन मूल्यांकनामुळे निकाल जाहीर करण्यात झालेल्या गोंधळाप्रकरणी विद्यार्थ्यांनी केलेल्या याचिका या प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी केलेले नाटक (पब्लिसिटी स्टंट) असल्याचा अजब दावा विद्यापीठाच्या वतीने अ‍ॅड्. रुई रॉड्रिक्स यांनी केला. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होत असताना त्यांनी गप्प बसावे, अशी तुमची इच्छा आहे का, असा सवाल न्यायालयाने केला. तसेच विद्यार्थ्यांच्या याचिका या जर प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठीचे नाटक आहे, तर याच गोंधळावरून कुलगुरूंना ‘घरचा रस्ता’ दाखवणे हेही विद्यापीठाने प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी केलेले नाटकच होते का, असा उलट सवाल करीत न्यायालयाने विद्यापीठाच्या दाव्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.

गोंधळाची स्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून एक प्रशिक्षण देणारी चित्रफीत तयार करण्यात आली असून त्याद्वारे मूल्यांकन कसे हे शिक्षकांना समजावून सांगण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना मूल्यांकन कसे करावे याचे मार्गदर्शन करणारी पुस्तिकाही देण्यात येईल. तांत्रिक चुका टाळण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचा दावाही विद्यापीठाने केला. ही प्रक्रिया पार पाडताना तज्ज्ञही तेथे उपस्थित असतील, असेही सांगण्यात आले.

अपयश मान्य करा!

विद्यापीठ ही नवी अद्ययावत प्रणाली राबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेली आहे हे विद्यापीठाने मान्य करावे, असे सुनावताना त्याची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी काय करणार याची विचारणाही न्यायालयाने केली. त्यावर एकदा अपयशी ठरलो म्हणून पुढेही अपयशी ठरू असे नाही, असा दावा करीत या गोंधळाची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी विद्यापीठाने प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. तसेच ऑनस्क्रीन मूल्यांकनाचे कंत्राट सध्याच्या कंपनीकडेच कायम ठेवण्यात आले असल्याचेही सांगितले.