उच्च न्यायालयाचा आज निर्णय

मुंबई : वास्तुसजावटकार अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेले रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्या तातडीच्या अंतरिम जामिनावर उच्च न्यायालय सोमवारी निर्णय देणार आहे.

अर्णब यांच्या याचिकेवरील सुनावणी शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संपली. त्यावेळी सगळ्या पक्षकारांच्या युक्तिवादांचा विचार करून आम्हाला निर्णय द्यायचा असल्याने आता या वेळी आम्ही अंतरिम आदेश करू शकत नाही. आम्ही अर्णब यांच्या अर्जावरील निर्णय लवकरात लवकर जाहीर करण्याचा प्रयत्न करू, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने अर्णब यांना तातडीचा दिलासा न देताच याचिके वरील निर्णय राखून ठेवला होता. दिवाळीची सुटी असल्याने निर्णय जाहीर करण्यासंदर्भात आम्हाला प्रशासकीय पातळीवर मुख्य न्यायमूर्तींची परवानगी घ्यावी लागेल, असेही न्यायालयाने नमूद के ले होते.

मात्र रात्री उशिरा न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर नोटीस प्रसिद्ध करत अर्णब यांच्या तातडीच्या अंतरिम जामिनाच्या मागणीवर सोमवारी दुपारी तीन वाजता निर्णय देण्याचे जाहीर  केले. त्यामुळे उच्च न्यायालय अर्णब यांना आपल्या अधिकारात तातडीचा अंतरिम जामीन मंजूर करणार की त्यांना कनिष्ठ न्यायालयात जामिनासाठी जाण्याचे आदेश देणार हे सोमवारी स्पष्ट होईल.

न्यायालयाने शनिवारी निर्णय राखून ठेवताना आरोपी जामिनासाठी कनिष्ठ न्यायालयात अर्ज करू शकतात. उच्च न्यायालयात दाखल याचिकांचा त्यात अडथळा ठरणार नाही. त्यामुळे आरोपींनी जामिनासाठी अर्ज केल्यास कनिष्ठ न्यायालयाने त्यावर योग्य तो निर्णय द्यावा, असेही स्पष्ट केले होते.

तळोजा कारागृहाबाहेर घोषणाबाजी

पनवेल :  अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथून तळोजा येथील मध्यवर्ती कारागृहात रविवारी सकाळी हलवण्यात आल्यानंतर कारागृहासमोरील रस्त्यावर अर्णव यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर लगेचच अर्णव यांच्या समर्थनार्थ घोषणा देणारे दाखल झाल्याने स्थानिक पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. अर्णव यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांचीही रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.