आर्थिक घोटाळ्यातील भारताचा फरार आरोपी मद्यसम्राट विजय मल्ल्याला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिला आहे. सरकारी यंत्रणांकडून संपत्ती जप्तीची सुरू असलेली कारवाई थांबवावी, अशी मागणी मल्ल्याकडून विनंती अर्जाद्वारे करण्यात आली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने त्यांचा हा विनंती अर्ज फेटाळून लावत, त्याला कोणताही दिलासा देण्यास नकार दिला आहे.

या अगोदर २ जून रोजी लंडन उच्च न्यायालयाने मल्ल्याला दिलासा देत, प्रत्यार्पणाविरोधात अपील करण्यासाठी परवानगी दिली होती. जर लंडन उच्च न्यायालयाकडून त्याला अपील करण्यास परवानगी दिल्या गेली नसती तर पुढील काही दिवसातच त्याला भारताकडे सोपवले गेले असते. मात्र लंडन न्यायालयाच्या निर्णयाने त्याला दिलासा मिळाला.

विजय माल्ल्याला भारताने फरार घोषित केलेले आहे. आता भारतीय यंत्रणा त्याच्यावर असलेल्या कर्जाच्या रक्कमेपोटी त्याची संपत्ती जप्त करत आहेत. ही कारवाई थांबवण्यासाठीच त्याने विनंती अर्ज केला होता. जो फेटाळण्यात आला आहे.