१७.१७ किलोमीटर लांबीच्या वांद्रे-वर्सोवा सी लिंकच्या कामाला मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी स्थगिती दिली. दोन आठवड्यांसाठी ही स्थगिती देण्यात आली आहे.

वांद्रे- वर्सोवा सी लिंकसंदर्भात राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) आणि रिलायन्स इन्फ्रास्टक्चर यांच्यात सप्टेंबर २०१८ मध्ये सामंजस्य करार झाला होता. उपनगरातील मुंबईकरांना अवघ्या २० मिनिटांमध्ये दक्षिण मुंबई गाठण्यास लाभदायी ठरणाऱ्या १७.१७ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग वाहनचालकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. या मार्गाचे कामही सुरु झाले होते.  या प्रकल्पाच्या कामात पर्यावरणाचे नुकसान होत असल्याचे काही संघटनांचे म्हणणे होते. या प्रकरणी मुंबई हायकोर्टातही याचिका दाखल झाली होती.

प्रकल्पाचे काम करताना जुहू- कोळीवाडा येथील समुद्रात बेकायदेशीरपणे भर टाकून त्या जागेचा वापर सुरु असल्याचे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. हायकोर्टाने प्रकल्पाच्या कामास दोन आठवड्यांची स्थगिती दिली आहे.

जाणून घ्या या प्रकल्पाविषयी
> वांद्रे-वर्सोवा सागरी मार्गाची लांबी १७.१७ किलोमीटर आहे.
> या मार्गावर मुख्य रस्त्यासह वांद्रे जोडरस्ता, कार्टर रोड जोडरस्ता, जुहू कोळीवाडा जोडरस्ता, नाना नानी पार्क जोडरस्ता येथे टोल नाके उभारण्यात येतील.
> पश्चिम द्रुतगती महामार्गाला हा रस्ता उड्डाणपुलांच्या माध्यमातून थेट जोडण्यात येणार आहे.
> पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वर्सोवा-अंधेरी, बोरीवली या भागांतील लोकांना दक्षिण मुंबईत येण्यासाठी दोन ते तीन तासांचा वेळ लागतो. मात्र सेतूमुळे प्रवास कोंडीमुक्त होईल.