मुंबई उच्च न्यायालयाला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधत उच्च न्यायालयाचा समृद्ध इतिहास लोकांसमोर आणण्याच्या हेतूने न्यायालयीन संग्रहालय स्थापन करण्याची घोषणा दोन वर्षांपूर्वी करण्यात आली होती. मात्र उच्च न्यायालयातील न्यायालय क्रमांक १७ मध्ये सज्ज होणाऱ्या न्यायालयीन संग्रहालयाचे कामकाज निधीअभावी रखडले होते. परंतु दोन वर्षांच्या कालावधीनंतर हे संग्रहालय अखेर सज्ज झाले असून शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार आहे.या संग्रहालयाच्या माध्यमातून उच्च न्यायालयातील आणि राज्यातील समृद्ध न्यायव्यवस्थेचा इतिहास उलगडला जाणार आहे. अ‍ॅड. राजन जयकर यांच्याकडे या न्यायालयीन संग्रहालयाची धुरा देण्यात आली आहे.