उच्च न्यायालयाचा खोचक सवाल
काँग्रेसचे कायकर्ते संदीप सावंत यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याप्रकरणी माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर आपण सुनावणी घेऊ शकत नसल्याचे उच्च न्यायालयाच्या सुट्टीकालीन न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. त्याचवेळेस नीलेश यांची ‘वट’ पाहता त्यांना कुणी अटक करेल का? असा खोचक सवाल करत न्यायालयाने त्यांना गुरूवारी अर्जावर होणाऱ्या सुनावणीपर्यंत दिलासा देण्यासही नकार दिला.
अर्जावरील सुनावणी अन्य सुट्टीकालीन न्यायमूर्तीकडे गुरूवारी होईपर्यंत नीलेश यांना अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी विनंती त्यांच्या वकिलांकडून करण्यात आल्यावर न्यायालयाने हा खोचक सवाल केला.
चिपळून न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर अटक होण्याच्या भीतीने नीलेश यांनी अटकपूर्व जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाचे सुट्टीकालीन न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर त्यांचा अर्ज बुधवारी सुनावणीसाठी आला. मात्र नीलेश यांच्या याचिकेवर आपण सुनावणी घेऊ शकत नसल्याचे न्यायमूर्ती नाईक यांनी स्पष्ट करत अन्य सुट्टीकालीन न्यायालयासमोर तो सादर करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे नीलेश यांच्या याचिकेवर सुट्टीकालीन न्यायालयाचे न्या. एम. एस. कर्णिक यांच्यासमोर गुरुवारी सुनावणी होणार आहे. परंतु तोपर्यंत त्यांना अटकेपासून संरक्षण देण्याची विनंती नीलेश यांच्या वकिलांनी न्यायालयाकडे केली. आपल्याला माहीत आहे अशी विनंती करणे असाधारण आहे. मात्र पोलीस दारापर्यंत येऊन पोहोचले आहेत. त्यामुळे त्यांनी संरक्षण देण्यात यावे, असे नीलेश यांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर नीलेश यांची वट पाहता त्यांना कुणी अटक करू शकेल असे तुम्हाला वाटते का? असा उलट सवाल न्यायालयाने वकिलांना केला. सावंत यांचे गेल्या २४ एप्रिल रोजी चिपळून येथील त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना मुंबईला नेऊन मारहाण केल्याचा गुन्हा नीलेश, त्यांचे अंगरक्षक, मनीष सिंग, जयकुमार, तुषार पांचाळ आणि मामा खानविलकर यांच्याविरूद्ध नोंदवण्यात आला आहे.