10 July 2020

News Flash

आधी महामार्गाच्या व्याख्येचा गोंधळ दूर करा!

दारूबंदीप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

मुंबई उच्च न्यायालय. ( संग्रहित छायाचित्र )

दारूबंदीप्रकरणी उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

राज्य मार्ग आणि राज्य महामार्ग म्हणजे एकच आहेत की त्यांची व्याख्या वेगळी आहे, असेल तर ते अधिसूचित करणारा आदेश वा अधिसूचना आहे का, असा सवाल करत हा गोंधळ आधी सोडविण्याचे उच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारला बजावले. ही बाब स्पष्ट नसेल तर महामार्गापासून ५०० मीटरच्या परिघात मोडणाऱ्या दारू विक्रीच्या दुकानांवर सरसकट बंदीचे समर्थन कसे काय केले जाऊ शकते, असेही न्यायालयाने सुनावले. तसेच राज्य मार्ग आणि राज्य महामार्ग यातील फरक स्पष्ट करण्याबरोबरच निर्णयाचे समर्थन करणारी कागदपत्रे सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत. शिवाय राज्यात किती राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग आहेत याची यादीही सादर करण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

राज्य आणि राष्ट्रीय महामार्गापासून ५०० मीटरच्या परिघात आम्ही मोडत नाही, असा दावा करत राज्यातील विविध दारू विक्री करणारे अन्य ४० दुकानदार, बारमालकांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनू केमकर आणि न्यायमूर्ती एम. एस. सोनाक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उत्पादन शुल्क विभाग यांच्यामध्येच राज्य मार्ग आणि राज्य महामार्गावरून गोंधळ आहे. तसेच सरकारी कागदपत्रांमध्ये राज्यमार्ग आणि राज्य प्रमुख महामार्ग अशी विभागणी करण्यात आली आहे, अशी बाब याचिकाकर्त्यांच्या वतीने न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. त्याचाच दाखला देत आमची दुकाने राज्य मार्गावर आहेत राज्य महामार्गावर नाहीत. परंतु तरीही आमच्यावर बंदीचा निर्णय लादण्याच आल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला. त्यावर याचिकाकर्त्यांनी उपस्थित केलेले मुद्देही महत्त्वाचे आहेत. परंतु म्हणून बंदीच्या निर्णयाला सरसकट स्थगिती दिली जाऊ शकत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच त्याबाबत सरकारला त्यांची बाजू मांडण्यास वेळ देण्याची गरज असल्याचे नमूद केले. त्याच वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा दाखला देत सरसकट बंदी घालण्याची घाई करण्यावरून सरकारला फटकारले.

  • पुढील सुनावणीच्या वेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनाही हजर राहण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 8, 2017 2:54 am

Web Title: bombay high court on alcohol ban
Next Stories
1 अबू आझमींचा पुतण्या आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ तस्कर
2 दोन पोलिसांवर बलात्कार आणि वेश्याव्यवसायाचा आरोप
3 खड्डय़ांबाबत अभियंत्यांच्या मोबाइलवर तक्रार करा!
Just Now!
X