उच्च न्यायालयाने सीबीआय-एसआयटीला खडसावले

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना शोधण्यासाठी कर्नाटक येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून उघड होणाऱ्या माहितीवर विसंबून राहणे सोडा आणि स्वतंत्र तपास करा, असे उच्च न्यायालयाने गुरुवारी सीबीआय आणि विशेष तपास पथकाला (एसआयटी) खडसावले.

सीबीआय संचालक आणि राज्याच्या गृहसचिवांना पुढील सुनावणीला हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अद्याप आरोपपत्र दाखल केले नसल्याबाबतही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यावर लवकरच आरोपत्र दाखल करण्यात येईल, असा दावा सीबीआयने केला.

दाभोलकर आणि पानसरे कुटुंबीयांनी केलेल्या याचिकांवर गुरुवारी झालेल्या सुनावणीत एसआयटीने तपासाबाबत दाखल केलेला प्रगती अहवाल वाचल्यानंतर न्यायालयाने दोन्ही यंत्रणांना दुसऱ्या तपास यंत्रणेने अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून उघड होणाऱ्या माहितीवर विसंबून राहण्याबाबत फैलावर घेतले. दोन्ही हत्यांचा तपास स्वतंत्र आणि प्रामाणिकपणे करण्याचेही न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने दाभोलकर तसेच पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या अनुक्रमे सीबीआय व एसआयटीला बजावले.

दोन्ही यंत्रणांनी यापूर्वीही या आरोपींची चौकशी केल्याचे आणि त्यांनी दिलेल्या माहितीचा फरारी आरोपींना शोधण्यासाठी मदत होत असल्याचा दावा केला होता. अहवालात मात्र फरारी आरोपींना शोधण्यासाठी नेमके काय केले जात आहे, याचा उल्लेख नाही. त्यामुळे दुसऱ्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून उघड होणाऱ्या माहितीवर दोन्ही तपास यंत्रणा पूर्णपणे अवलंबून राहू शकत नाही. हे असे किती काळ चालणार? असा सवाल करतानाच तुम्ही दोन्ही प्रकरणांचा स्वतंत्र तपास करायला हवा. या दोन्ही हत्या लंकेश यांच्या हत्येपूर्वी झाल्या होत्या. त्यामुळे त्याबाबत स्वतंत्र तपास करून पुरावे शोधायला हवे, असेही न्यायालयाने सुनावले.

तपासात अपयशी

एकीकडे दुसऱ्या राज्यातील तपास यंत्रणेला योग्य ते सहकार्य मिळत असताना आपल्याकडे नेमके उलट चित्र आहे. आपल्याकडील तपास यंत्रणा नोकरशहांच्या अडथळ्यांमुळे वा समन्वयाच्या अभावामुळे दोन्ही हत्या प्रकरणांचा तपास करण्यात अपयशी ठरत आहेत, असे ताशेरेही न्यायालयाने ओढले.