शेतकरी संपाबाबतची याचिका उच्च न्यायालयाकडून निकाली

शेतकऱ्यांच्या भल्यासाठी याचिका केली तर त्यांचे भले नेमके कसे होईल याचा आणि स्वामीनाथन आयोगाने नेमक्या काय शिफारशी केल्या आहेत, त्याचा आधी सखोल अभ्यास करा व नव्याने याचिका करा, असे स्पष्ट करत शेतकऱ्यांच्या संपाप्रकरणी करण्यात आलेली याचिका उच्च न्यायालयाने निकाली काढली. तर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पिकाला आवश्यक तो भाव देण्याबाबत शेतकरी व सरकारचे शिष्टमंडळ लवकरच केंद्र सरकारकडे निवेदन सादर करणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने या वेळी न्यायालयाला देण्यात आली.

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आणि स्वामीनाथन समितीच्या शिफरशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश राज्य सरकारला द्या, अशी मागणी करणारी जनहित याचिका हेमंत पाटील यांनी केली होती. त्यात त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या स्वामीनाथन समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. शिवाय शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याऐवजी त्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीवरून राजकारण करणाऱ्या राज्य सरकारला नोटीस बजावून त्याचे स्पष्टीकरण मागण्याचीही मागणी केली होती. मुख्य न्यायमूर्तीच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली.