News Flash

विद्यार्थ्यांना पुरवणी द्या!

न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर विद्यापीठाची महाविद्यालयांना सूचना

संग्रहित छायाचित्र

न्यायालयाच्या अंतरिम आदेशानंतर विद्यापीठाची महाविद्यालयांना सूचना

ऑनस्क्रीन मूल्यांकन पद्धतीमध्ये मूळ उत्तरपत्रिका आणि पुरवणी याचे मूल्यांकन करणे अडचणीचे ठरत असल्याचा अजब दावा करणाऱ्या मुंबई विद्यापीठाला उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर विद्यार्थ्यांनी पुरवणीची मागणी केल्यास त्यांना देण्यात यावी, अशा आशयाचे परिपत्रक विद्यापीठाने शनिवारी अखेर जाहीर केले. त्यामुळे इथून पुढे सर्व विद्यार्थ्यांना पुरवणी घेण्याची मुभा असणार आहे.

ऑनस्क्रीन मूल्यांकनाच्या पद्धतीमुळे गेल्या सत्रामध्ये लांबलेल्या निकालाबरोबरच काही उत्तरपत्रिका गहाळ झाल्याचे निदर्शनास आले होते. मूळ उत्तरपत्रिका आणि पुरवणी यांच्या ‘बारकोड’ वेगळे असल्याने हा गोंधळ निर्माण झाला होता. तेव्हा विद्यार्थ्यांना परीक्षांच्या वेळी पुरवण्याच दिल्या नाहीत, तर त्या गहाळ होण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि मुख्य उत्तरपत्रिका पुरेशी असल्याचा अजब दावा करत विद्यापीठाने पुरवण्या न देण्याचे आदेश जाहीर केले होते. परंतु या आदेशाला मानसी भूषण या विधी शाखेच्या विद्यार्थिनीने अ‍ॅड्. विशाल कानडे यांच्यामार्फत याचिका करत आव्हान केले.

या याचिकेच्या सुनावणी दरम्यान विद्यापीठाच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना दिली जाऊ शकत नाही वा विद्यापीठाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका विद्यार्थ्यांना बसू दिला जाऊ शकत नाही, असे ताशेरे ओढत पदवी तसेच पदव्युत्तर अभ्यासक्रमांची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी पुरवणी देण्याची मागणी केल्यास त्यांना त्या उपलब्ध करण्याचे अंतरिम आदेश उच्च न्यायालयाने शुक्रवारी मुंबई विद्यापीठाला दिले होते.

न्यायालयाच्या या आदेशानंतर शनिवारी परीक्षा मंडळाची तातडीने बैठक बोलावून यामध्ये याबाबत चर्चा करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत विद्यार्थ्यांनी पुरवणी मागितल्यास देण्यात यावी, अशा आशयाचे परिपत्रक अखेर विद्यापीठाने शनिवारी जाहीर केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2017 1:55 am

Web Title: bombay high court on mumbai university 3
Next Stories
1 विमानतळ मेट्रोने जोडणार
2 नव्या वर्षांच्या स्वागतासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळांकडे कल
3 न्यायवैद्यक पदवीधरांना अखेर सरकारी नोकऱ्यांची दारे खुली
Just Now!
X