मुंबईत परतण्यासाठी व्हिसा देण्याचे न्यायालयाचे आदेश

मुंबई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अन्य देशांतून येणाऱ्यांना व्हिसा देणे बंद करण्यात आले आहे. याचा फटका बसल्याने दुबईत अडकलेल्या १९ वर्षीय तरुणीच्या मदतीला उच्च न्यायालय धावून आले आहे. या तरुणीला मुंबईला परतण्याचा व्हिसा उपलब्ध करून देण्याचे आदेश उच्च न्यायालयाने संबंधित यंत्रणेला दिले आहेत.

त्याचवेळी या तरुणीची स्थिती लक्षात घेऊन तिला मदत करण्याऐवजी तिला दुबईत एकटीला राहण्यास भाग पाडल्याप्रकरणी दुबईतील भारतीय दूतावास आणि संबंधित विभागाच्या भूमिकेवर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

एवढेच नव्हे, तर हा आदेश केवळ या तरुणीच्या आईने केलेल्या याचिकेपुरता मर्यादित आहे. या तरुणीची स्थिती लक्षात घेऊन हे आदेश देण्यात आल्याचेही न्यायालयाने प्रामुख्याने स्पष्ट केले.

अमेरिकेहून दुबईमार्गे मुंबई असा प्रवास करताना ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर व्हिसाबाबत केंद्र सरकारच्या निर्देशांमुळे या तरुणीला दुबई येथेच रोखण्यात आले. तेव्हापासून ती तेथे अडकली आहे. मुलीची स्थिती लक्षात घेऊन तिला सहकार्य करण्यास दूतावासाने नकार दिल्यानंतर तिच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

तसेच मुलीला दुबई ते मुंबई प्रवासासाठीचा व्हिसा उपलब्ध करण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती. याचिकाकर्ती ही भारतीय आहे. मात्र तिच्या मुलीचा जन्म अमेरिकेत झाल्याने ती अमेरिकन नागरिक आहे. असे असले तरी तिचे शिक्षण मुंबईत झाले असून पुढील शिक्षणासाठी ती अमेरिकेत गेली होती. ती १२ मार्चला बोस्टन येथून मुंबईला यायला निघाली. परंतु हे विमान दुबईत उतरल्यावर तेथील विमान प्राधिकरणाने तिला मुंबईच्या विमानात बसण्यास मज्जाव केला. याचिकेची दखल घेत न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेतली.ही तरुणी कुटुंबाशिवाय, कुणाच्या आधाराशिवाय तेथे अडकली आहे, असे न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने नमूद केले. तसेच दुबई ते मुंबई या प्रवासासाठी तिला व्हिसा मंजूर करण्याचे आदेश दिले. केंद्र सरकारच्या व्हिसाबाबतच्या सूचना या मूळ विमानतळावरून उड्डाण करण्याच्या वेळेसाठी आहेत. त्यामुळे याचिकाकर्तीच्या मुलीला सरकारच्या निर्देशांच्या आधारे मुंबईकडे येणाऱ्या विमानात बसण्यास मज्जाव केला जाऊ शकत नाही.