सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला जावा अशी मागणी वारंवार केली जात आहे. मुंबई उच्च न्यायालयात याप्रकरणी आज सुनावणी पार पडणार होती. मात्र मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा फटका सुनावणीला बसला आहे. मुंबईत सोमवारी संध्याकाळपासून मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झालं आहे. याच पार्श्वभूमीवर सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे तपास सोपवण्याच्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे.

सुशांत सिंहने १४ जून रोजी वांद्रे येथील आपल्या राहत्या घऱी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुशांतवर मानसिक दबाव असल्याने आत्महत्या केल्याचा आरोप केला जात आहे. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. दुसरीकडे सुशांतच्या वडिलांनी पाटणा पोलीस ठाण्यात रिया चक्रवर्तीविरोधात तक्रार दाखल केली असल्याने बिहार पोलीसही तपास करत असून मुंबईत दाखल झाले आहेत. दुसरीकडे या प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी वारंवार केली जात आहे.

दरम्यान अतिवृष्टी होत असल्याने मुंबई आणि उपनगरातील सर्व शासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मदत व पुनर्वसन विभागाकडून ही माहिती देण्यात आली आहे. हवामान खात्याने अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला असून खबरदारी म्हणून शासकीय कार्यालयं आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या यंत्रणा मात्र सुरूच राहणार आहेत.

मुंबईत मुसळधार पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं असून रस्ते वाहतुकीसह लोकल वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या भागात सोमवार संध्याकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचले आहे. रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडून गेली आहे. मुंबई आणि ठाण्यासाठी रेड अलर्ट असून पुढचे ४८ तास असाच मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.