न्यायालयाचे भाष्य : धार्मिक वाद सामोपचाराने सोडवा
सध्याचा काळ असहिष्णुतेचा आहे. प्रत्येक गोष्टीचा वा भूमिकेचा विपर्यास केला जात आहे, असे सांगतानाच हाजी अली दर्गा समाधी परिसरात महिलांना घालण्यात आलेल्या प्रवेशबंदीचा मुद्दा न्यायालयाबाहेर सामोपचाराने सोडवा, असा सल्ला मंगळवारी न्यायालयाने याचिकाकर्ते आणि दर्गा ट्रस्ट यांना दिला.
मुंबईतील मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या वरळी येथील हाजी अली दग्र्यातील पुरुष संताची समाधी म्हणजेच ‘मझार’च्या परिसरात महिलांना प्रवेशबंदी आहे. दर्गा ट्रस्टच्या या निर्णयाविरोधात डॉ. नूरजहाँ मिर्झा यांनी याचिका केली दाखल केली आहे. त्यावरील सुनावणीच्या वेळी न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाने मंगळवारी उपरोक्त प्रतिपादन केले. हा वाद सामोपचाराने सोडवावा असा सल्ला देताना न्यायालयाने यावेळी पारसी समुदायातील एका धार्मिक वादाचा दाखलाही दिला. आंतरजातीय विवाह करणाऱ्या पारसी महिलेला त्यांच्या धार्मिक स्थळामध्ये प्रवेशबंदी करण्यात आली होती. त्या प्रकरणातही न्यायालयाने कुठलाही निर्णय न देता तो वाद न्यायालयाबाहेर सोडविण्याचा सल्ला दिला होता. त्या महिलेने अखेर सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. तिला तेथे दिलासा मिळाला होता. हे प्रकरण उद्धृत करतानाच न्या. कानडे यांनी सध्याच्या सामाजिक स्थितीवरही भाष्य केले. या प्रकरणाची अंतिम सुनावणी १५ डिसेंबर रोजी होणार आहे.